सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तान सातत्याने काश्मीरमध्ये हस्तक्षेप करत राहिला, तर त्यांना त्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहावे लागेल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला आहे. ते नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या पायाभरणी समारोहात बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की जर काश्मीरमधील दहशतवाद्यांकडून नागरिकांच्या हत्येचे पाकिस्तानकडून सर्मथन होत राहिले तर, सर्जिकल स्ट्राईक होणार आहे. जेव्हा देशात हल्ला झाला, तेव्हा भारताने सर्जिकल स्ट्राईक केले होते. आमच्या सीमांशी छेडछाड करणे सोपे नाही, हे आम्ही जगाला सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने सर्जिकल स्ट्राईक केली होती. तेव्हा समस्या तयार करणाऱ्या ताकदींना संदेश मिळाला होता. एका कार्यक्रमादरम्यान शाह यांनी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याविषयीच्या आठवणींचे स्मरण केले.
भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याचा विचार करू नये
शाह म्हणाले, की एकवेळ अशी होती बाहेरील शक्तीकडून देशात शांतता भंग करण्याचा विचार केला जात होता. मात्र, भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याचा विचार करू नये, असा सर्जिकल स्ट्राईकमधून संदेश दिला. आता, उत्तर दिले जाते.
राष्ट्रीय न्यायवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ गोव्यात सुरू-
अमित शाह यांनी गुरुवारी गोव्यामधील राष्ट्रीय न्यायवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाची पायाभरणी केली. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेनंतर गोव्यात या विद्यापीठाचे पहिले कॉलेज सुरू होणार आहे. एनएफएसयूमध्ये पाच कोर्स गुरुवारपासून सुरू होणार आहेत.
नुकतेच चार सैनिकांना काश्मीरमध्ये वीरमरण
जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई करताना एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि चार सैनिकांना 11 ऑक्टोबरला वीरमरण आले. 11 ऑक्टोबरला सकाळी जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत -
दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गृहमंत्रालय मोठी कारवाई करणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने प्रदेश नेतृत्वाशी चर्चा केली आहे. काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांची यादी गुप्तचर संघटना आणि सुरक्षा संस्थाकडून यादी मागितली आहे. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. मोदी सरकार इलेक्ट्रॉनिक इंटेल नेटवर्क भक्कम करत आहे. केवळ दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत ठेवणाऱ्या 'टीएमएस आणि एनएमबी' नेटवर्कचा देशभरात आणखी 451 ठिकाणी विस्तार केला जाणार आहे. गेल्या वर्षी सुरू केलेली ही मोहिम चालू वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या मध्यावर पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा निर्धार आहे.
0 Comments