सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी: दोनच दिवसांपूर्वी मायणी येथे पिस्तूलचा धाक दाखवून ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच चोरटयांनी हिवरवाडी येथील वकिलाचे आणि चक्क बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षाचे घर फोडून मोठा दणका दिला. बंद घर फोडून तेथून चोरट्यांनी जवळपास सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
याप्रकरणी अॅड पी. डी. सावंत यांनी मायणी पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अॅड. सावंत यांचे आई व वडील हे दोघेही हिवरवाडी येथे वास्तव्यास आहेत. तर ते स्वतः व त्यांचे बंधू असे एकत्र व्यवसायासाठी वडूज येते वास्तव्यास आहेत.
गेल्या आठवड्यात अॅड. सावंत यांच्या वडिलांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांचे कुटुंब सध्या वडूज येथे वास्तव्यास आहे.
काल ते स्वतः व आई सकाळी हिवरवाडी येथे आले होते. दिवसभर शेतातील कामे करून संध्याकाळी ते परत वडूजला गेले. सकाळी त्यांच्या चुलत बंधूनी त्यांना फोन करून चोरी झाल्याच्या घटनेची माहिती दिली. तत्काळ त्यांनी हिवरवाडी येथे येऊन पहाणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी मायणी येथील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी पाहणी करून सदर घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.संध्याकाळी श्वान पथकाच पाचारण करण्यात आले होते.
श्वानाने कान्हरवाडीच्या दिशेने माग काढला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पालेकर करीत आहेत.
0 Comments