सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँके निवडणुकीसाठी सोसायटी गटातून राष्ट्रवादीसमोर निर्माण झालेला पेच सुटल्यात जमा असून नंदकुमार मोरे यांची वाट सुकर झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासूनच जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम वाजत होते. खटाव सोसायटी गटातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी निमसोडचे युवा नेते नंदकुमार मोरे यांनी गेल्या वर्षभरापासून यासाठी फिल्डिंग लावली होती. औंध अधिपती गायत्रीदेवींच्या माध्यमातून अजितदादांच्या पचनीही ही बाब त्यांनी पाडली होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी खटाव तालुक्यात झालेल्या राजकीय, शासकीय दौर्यात अजितदादांनी नंदकुमार मोरे यांची उमेदवारी जाीहर केली होती. मात्र, या मतदारसंघावर पक्षापेक्षाही व्यक्तिगत प्राबल्य असलेल्या प्रभाकर घार्गेंचा याला विरोध होता. मोरेंची उमेदवारी घार्गेंना मान्य नव्हती. एका प्रकरणामुळे ते अडचणीत आल्याने ते स्वत: लढू शकत नसले नसले तरी त्यांच्या पत्नी इंदिरा घार्गे उमेदवारी करतील, असा शड्डू घार्गेंनी ठोकला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून याबाबात मोठा सस्पेन्स होता. त्यातच इंदिरा घार्गे यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने खटाव सोसायटी गटात चुरशीची निवडणूक होईल अशी अटकळ होती. मात्र, सोमवारी इंदिरा प्रभाकर घार्गे यांनी महिला राखीव मधून अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीने घार्गे-मोरे वादावर तोडगा काढल्याचे स्पष्ट झाले असून अर्ज माघारीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
भाजपचे तोकडे आव्हान
इंदिरा घार्गे यांच्या दुसर्या अर्जामुळे मोरे यांची सोसायटी गटातील वाटचाल आता सुकर झाली आहे. येथे भाजपच्या उमेदवाराने अर्ज भरला असला तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारापुढे भाजपचे येथे फारसे प्राबल्य नसल्याने मोरेंची जिल्हा बँकेत विनासायास एंट्री होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे मोरे यांचे जिल्हा बँक संचालकपदाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत.
0 Comments