Ticker

6/recent/ticker-posts

रामराजे- उदयनराजे यांच्यात कमराबंद चर्चा

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा : विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. या राजेशाही भेटीची साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. या भेटीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे संदर्भ होते, असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाने काही वर्षापूर्वी रामराजे व उदयनराजे यांच्यातील टोकाचे राजकीय कटुत्व अनुभविले आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षात उदयनराजे यांच्या विरोधाचा सूर पूर्णतः मावळला आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा रामराजे उदयनराजे यांच्या शासकीय विश्रामगृहातील भेटीने राजकीय वर्तुळाच्या भुवया पुन्हा उंचावल्या. जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर असताना ही झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. विश्रामगृहाच्या कक्ष क्रमांक एकमध्ये दोन्ही नेत्यांची अर्धा तास चर्चा झाली. चर्चेनंतर एकमेकांचा निरोप घेताना दोघांमध्ये हास्यविनोद रंगले.

जिल्हा बँकेत भाजपला रोखण्याची राष्ट्रवादीची रणनीती स्पष्ट आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे अर्ज पात्र ठरल्याने राष्ट्रवादीच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. शिवाय बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचीही उदयनराजे यांना वगळून जिल्हा बँकेचे राजकारण पुढे आणण्याची रणनीती तयार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रामराजे व उदयनराजे यांच्या झालेल्या भेटीचे राजकीय संदर्भ लावले जात आहेत . रामराजे व उदयनराजे यांचे घटस्थापनेच्या मुहुर्तावर आंतरविरोध मावळल्याचे या घडामोडींवर दिसून येत आहे .

या भेटी संदर्भात पत्रकारांनी रामराजे यांना छेडले असता ते म्हणाले, उदयनराजे व आमच्या घराण्याचे नऊ पिढ्यांचे सबंध आहेत. ही एक अनौपचारिक बैठक होती. त्याचे राजकीय अर्थ काढू नये. ही भेट जिल्हा बँकेच्या अनुषंगाने होती काय ? हे विचारल्यावर रामराजे म्हणाले, अहो अजून जिल्हा बँकेची निवडणूकच जाहीर झाली नाही तर चर्चा काय करणार ? असे रामराजे म्हणाले .

Post a Comment

0 Comments