सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड: ऊस घेऊन कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली न दिसल्याने त्यावर आदळून झालेल्या अपघातात शेळकेवस्ती (पळशी, ता. माण) येथील दुचाकीवरून निघालेला राष्ट्रीय थाळीफेक खेळाडू ठार झाला. कृष्णा जालिंदर शेळके (वय 28) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला.
गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या कृष्णा ने चमकदार कामगिरी केली होती. याबाबत घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. सातारा-लातूर राज्यमार्गावर पळशी फाट्यानजीक असलेल्या वाण्याची झाडी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅ़क्टर रस्त्याच्या मध्यभागी थांबला होता. हा ट्रॅ़क्टर दोन ट्रॉल्यांसह होता. त्याचवेळी कृष्णा घराकडे निघाला होता.
ट्रॅक्टरच्या पाठिमागील ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने शेळकेला ती ट्रॉली दिसून आली नाही. ट्रॉलीवर त्याची दुचाकी आदळली. या अपघातात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला. मयत कृष्णा शेळके यांचा भाऊ नितीन जालिदर शेळके यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस हवालदार व्ही. अभंग करत आहेत
ते स्टेट्स ठरले अखेरचे
राष्ट्रीय खेळाडू आणि फोटोग्राफीचा व्यवसाय करणार्या कृष्णाने रविवारी सायंकाळी 7 वाजता आयुक्त नितीन वाघमोडे, बाळासाहेब काळे, आप्पासाहेब पुकळे यांच्यासमवेत म्हसवड येथे फोटो काढला होता आणि त्याचे व्हॉट्सअॅपला स्टेटसही ठेवले होते. ते त्याचे अखेरचे स्टेटस ठरले. फोटोग्राफीच्या व्यवसायामुळे तो परिसरात परिचित होता. मनमिळावू स्वभावाच्या युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. माहिती कळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कृष्णाचा अंत झाला होता.
0 Comments