Ticker

6/recent/ticker-posts

वडूज नगरपंचायत पॅनेलबाबत औत्सुक्य

वडूज/धनंजय क्षीरसागर
वडूज नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी बुधवार दि. 1 पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. शेवटचा दिवस उजाडला तरी अद्याप प्रमुख राजकीय पक्षांची पॅनेल निश्‍चित झाली नाहीत. त्यामुळे निवडणूक तिरंगी की चौरंगी होणार ? तसेच कोणत्या पॅनेलबरोबर कोण जाणार याबाबत मतदारांसह सर्वसामान्य जनतेमध्ये औत्सुक्य आहे.
आज मितीला आ. जयकुमार गोरे यांचे नेतृत्व मानणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या पॅनेलची सर्व 17 प्रभागात उमेदवारी चाचपणी पुर्ण झाल्याचे समजते. विखुरलेले विरोधक व पक्षांतर्गत गटबाजीमुळे अन्य पक्षातील काही प्रमुख मंडळी त्यांच्या संपर्कात येत असल्याची चर्चा आहे. याचबरोबर विधानसभेला बाजूला झालेले काही लोकही आ. जयाभाऊंच्या जवळ जावू पाहात आहेत. दुसर्‍या बाजूला निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख हे जेष्ठ नेते दादासाहेब गोडसे, माजी तालुकाध्यक्ष हिंदुराव गोडसे यांना बरोबर घेवून राष्ट्रवादी प्रणीत पॅनेल टाकण्याच्या विचारात आहेत. त्यादृष्टीने समविचारी लोकांना बरोबर घेण्याची त्यांची मानसिकता राहणार आहे. या गटाशी बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांच्या गटाशी चर्चा सुरु असल्याचे समजते. दुसर्‍या बाजूला जिल्हा बँकेच्या निवडणूकीपासून माजी आमदार प्रभाकर घार्गे, काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर हे तिघेजण एकत्र आले आहेत. या तिघांनी विधानसभा निवडणूकीत प्रभाकर देशमुख यांची पाठराखण केली होती. मात्र सद्या यांच्यामधून विस्तवही जात नसल्यासारखी परस्थिती आहे. अश्या परस्थितीत या सर्व विळ्या-भोपळ्यांची एकत्र मोठ बांधणे अवघड काम आहे. त्यातूनही राष्ट्रवादी-काँग्रेस अशी आघाडी झाली तरी काही प्रभागात उमेदवारी देण्यासाठी रस्सीखेच होवू शकते.

शिवसेनेचा तिसरा पर्याय

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत शिवसेनेची काही जागांवर बोळवण करुन मत विभागणी टाळण्याचा राजकीय जाणकारांचा प्रयत्न आहे. मात्र नव्यानेच शिवधनुष्य हाती आलेले नगरसेवक शहाजीराजे गोडसे आपल्या स्वत:ची ताकद आजमावण्यासाठी स्वतंत्र तिसरा पर्याय देण्याच्या पावित्र्यात असल्याचे समजते. त्यांच्या पॅनेलमधून प्रत्येक प्रभागात नवीन चेहेर्‍यांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. या तीन पॅनेल व्यतिरीक्त अनेक प्रभागात हौसे, गवसे उभारणार असल्याने प्रत्येक ठिकाणी चौरंगी, पंचरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक प्रभागात घुसखोरीची शक्यता

नगरपंचायतीच्या 17 प्रभागापैकी प्रभाग 10, 11 मध्ये अनुसुचित जाती प्रवर्ग, प्रभाग 5, 14, 17 या प्रवर्गात ओ.बी.सी. आरक्षण आहे. तर प्रभाग क्र. 2,3,4, 6,7,8,9 या सात प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुले आहेत. मात्र या सर्वच ठिकाणी मराठा बहुजन समाजापेक्षा इतर समाजाची मतदार संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रभाग 12, 13, 15, 16 या चारच प्रभागातून खात्रिशीररित्या ओपनला संधी मिळू शकते. अश्या परस्थितीत प्रभाग 3, 4, 9 या तिन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या प्रभागातील मात्तब्बर उमेदवारांची घुसखोरी होण्याची शक्यता आहे.

लिंगायत, मुस्लीम एकीचे आवाहन

मागील पंचवार्षिक निवडणूकीत प्रभाग क्र. 6 मध्ये लिंगायत व मुस्लीम समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. मात्र या दोन्ही समाजातील प्रत्येकी 3 उमेदवार निवडणूकीत उभे राहिले. त्यामुळे मतविभागणीचा मोठा फटका बसून उचलते उमेदवार अनिल माळी यांनी ‘ मोहल्यात कमळ ’ फुलविले होते. या पार्श्‍वभूमीवर मागील धडा घेवून दोन्ही समाज एकीकरण करणार की मागच्या प्रमाणेच एकमेकांचे उट्टे काढत बसणार याचे सर्वसामान्यांना औत्सुक्य आहे.

Post a Comment

0 Comments