Ticker

6/recent/ticker-posts

गलवानमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारतीय सैन्याने तिरंगा फडकवून दाखविले सामर्थ्य

वृत्तसंस्था
गलवान: 
काही दिवसांपूर्वी चीनने लडाखमधील गलवान येथील सीमारेषेच्या चीनकडच्या भागात चीनचा ध्वज फडकविल्याने निर्माण झालेल्या वादाला भारताच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतानेही गलवान सीमारेषेवर तिरंगा फडकवून चीनला आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. यासाठी सैन्याची प्रशंसा होत आहे.
नूतन वर्षाच्या प्रथम दिनी भारतीय सेनेच्या सीमेवरील तुकडीने हे ध्वजारोहण केले. त्याआधी चीनने त्याच्या भागात ध्वज लावला होता. तथापि, चीनने भारताच्या भागात त्याचा ध्वज लावल्याचा आरोप काँगे्रसह विरोधी पक्षांनी केला होता. भारताच्या सेनेने हा आरोप फेटाळला होता. तसेच चीनने त्याच्याच भागात ध्वज लावल्याचे स्पष्ट केले होते. नंतर 1 जानेवारीला भारताने गलवान सीमारेषेवरच भारताचा तिरंगा फडकावून चीनचा नक्षा उतरवला आहे.
या सीमारेषेवर 5 मे 2020 पासून भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरु आहे.
दोन्ही सैन्यांमध्ये गेल्या वर्षी मारामारी होऊन भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. चीननेही आपले अनेक सैनिक गमावले होते.
त्यांची संख्या 40 हून अधिक असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. मात्र, चीनने बरेच दिवस त्याचे सैनिक मारले गेल्याची वस्तुस्थिती मान्य केली नव्हती. हा प्रसंग घडल्यानंतर सहा महिन्यांनी चीनने त्याचेही काही सैनिक मारले गेल्याचे मान्य केले.
मात्र, त्यांची संख्या भारताच्या हुतात्मा सैनिकांपेक्षा कमी असल्याचा दावा केला होता.
दोन्ही देशांच्या सेनाधिकार्‍यांमध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍या होऊनही सीमेवरील तणावर अद्याप संपुष्टात आलेला नाही.
चीनने सध्या लडाख सीमेवर 60 हजार सैनिक आणले असून भारतानेही तेवढ्याच संख्येने आपल्या सैनिकांची नियुक्ती केली आहे. दोन्ही देशांचे सैनिक सध्या लडाख सीमेवर दोन स्थानी डोळ्यांना डोळे भिडवून उभे आहेत. मात्र, अद्याप तरी परिस्थिती शांत आहे.

Post a Comment

0 Comments