Ticker

6/recent/ticker-posts

चोरट्यांनी उडवली म्हसवड पोलिसांची झोप यंत्रणा आव्हान स्वीकारणार का?

 सह्याद्री न्यूज नेटवर्क

म्हसवड: म्हसवड शहरात बुधवारी मध्यरात्री 2 ते अडीच च्या दरम्यान पाच ते सहा सशस्त्र टोळक्याने दहा ते बारा घरफोड्या करत अक्षरश: धुडगूस घातला. रात्रीतून काही युवकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. दिवस उजाडताच चोरीच्या बातमीने म्हसवडकरांची झोप उडाली तर मध्यवस्तीत केवळ बंद घरे टार्गेट करुन झालेल्या या घरफोड्यांनी पोलीस दलही हादरले आहे. डीवायएसपी नीलेश देशमुख म्हसवडमध्ये तळ ठोकून असून आता चोरटे पकडण्याचे मोठे आव्हान सहायक निरीक्षक बाजीराव ढेकळे व त्यांच्या टीमवर आहे.
याबाबत माहिती अशी, येथील सनगर गल्ली, गुरवगल्ली, मुख्य बाजारपेठेसह खंडोबा मंदिर परिसरातील 10 हून अधिक घरांचे कुलुप कोयंडे तोडून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लपास करुन  शहरात खळबळ उडवून दिली. तर सदर चोरट्यांच्या टोळक्याने चोरी करताना दशहत माजवण्यासाठी हातात नंग्या तलवारी घेऊन फिरत असल्याचे दृष्य शहरातील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. शहरात 10 ते 12 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप 2 जणांनीच याबाबत म्हसवड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फिर्यादीवरुन घडल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखुन याठिकाणी श्‍वानपथकास पाचारण करुन तपासचक्रे जोरात फिरवली आहेत.
 मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटे येथील सनगर गल्ली येथे 7 ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटुन नेला. यामध्ये पालिकेच्या एका नगरसेवकाच्या घरातून मोठी रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे, तर अन्य एकाच्या घरात दागिन्यावर डल्ला मारला आहे.
येथील खंडोबा मंदिर लगत राहत असलेले सूर्यकांत कथले यांच्याही घराचा कोयंडा तोडुन चोरट्यांनी घरातून त्यांच्या बहिणीचा मोबाईल व रोख 2 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत.
 गुरव गल्ली येथे मध्यरात्री चोरट्यांनी काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न करताना येथील एकाला जाग आल्याने त्याने आरडा ओरडा करीत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तेथून पळ काढला.
मात्र, त्या व्यक्तीच्या दिशेने जोरदार दगडांचा वर्षाव करीत चोरट्यांनी दहशत निर्माण केली. यामुळे भयभीत झालेल्या त्या तरुणाने चोरट्यांचा पाठलाग थांबवला. तसेच सनगरगल्ली येथील सासणे बोळात सरस्वती महेश ईकारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 36 ग्रैम वजनाचे अंदाजे किमत 1 लाख 46 हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले.
वरील सर्व ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत दहशत निर्माण करताना नंग्या तलवारी नाचवल्या असल्याचे शहरातील एका ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाले असून पोलिसांनी फिर्याद दाखल होताच सदरचे चित्रिकरण ताब्यात घेतले असून चोरीचा छडा लावण्यासाठी शहरात श्‍वानपथकास व ठसे तज्ञांना पोलीसांनी पाचारण करण्यात आले होते. सहायक निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी फिरवली आहेत.
दरम्यान म्हसवड शहरात एकाच रात्रीत 10 हून अधिक ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने म्हसवडकरांत कमालीची भीती पसरली असून पोलीसांनी त्वरीत चोरट्यांचा बंदोबस्त करीत शहर व परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी म्हसवडकर जनतेतून होत आहे.

डीवायएसपींचा तळ

चोर्‍यांची घटना घडल्यानंतर डीवायएसपी नीलेश देशमुख यांनी म्हसवडमध्ये तळ ठोकला असून तपासकामी अनेक सूचना दिल्या. तसेच आपल्या खास स्टाईलमध्ये अनेकांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सायंकाळी उशिरा श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले होते तर सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनीही आपली ताकद पणाला लावत चोरट्यांना पकडण्याचा चंग बांधला आहे.

कर्मचारी वाढवण्याची गरज

सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या म्हसवड पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून येथे काम करण्यास अनेक पोलीस कर्मचारी इच्छुक नसतात. येथील कार्यभाराच्या मानाने येथे कर्मचारी संख्या कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच हद्दीत अनेक संवेदनशील गावे असल्याने म्हसवड पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. एसपी अजयकुमार बन्सल यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून येथे कर्मचारी वाढवून द्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

रेकी करून चोर्‍याचा संशय

शहरात झालेल्या घरफोड्या या संपूर्ण परिसराची रेकी करूनच केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून चोरटयांनी आठवडाभर तरी या भागावर पाळत ठेवली असावी, असा जाणकारांचा कयास आहे. त्यामुळे मागील आठ दहा दिवसांचे सीसीटीव्ही फूटेज तपासल्यास काही हाती लागू शकेल, असाही अंदाज काही नागरिकांनी वर्तवला आहे. 

सीसी टीव्हीत कैद झाले चोरटे पहा व्हिडीओ

Post a Comment

0 Comments