वाळूप्रश्‍नी आमदार जयकुमार गोरे आताच आक्रमक का? - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, March 28, 2022

वाळूप्रश्‍नी आमदार जयकुमार गोरे आताच आक्रमक का?

 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज:
माणदेशातील  वाळूप्रश्‍न  थेट विधानसभेत पोहचला आहे. आमदार जयकुमार गोरेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब, ‘लक्षवेधी’वर महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत  चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीतरी वाळू तष्करासह महसूल व पोलीस विभागातील बडे मासे गळाला लागणार का? तसेच विषयावर आमदार गोरे आत्ताच इतके आक्रमक का झाले आहेत. याबाबत माण-खटाव तालुक्यात उलटसुलट चर्चा असून वाळू हे केवळ निमित्त असून आपल्या मनाविरुद्ध इतरांच्या शिफारशीने आलेल्या अधिकार्‍यांना ‘टार्गेट’  हा आमदारांचा छुपा अजेंडा  आहे का? तसेच त्यांचाही वाळू व्यवसायाशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा मुद्दाही सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे.
 माण तालुक्यातील अवैध वाळू तस्करी आणि वाळू तस्करांबरोबर अधिकार्‍यांचे असलेले आर्थिक व्यवहारांचे साटेलोटे  थेट विधिमंडळाच्या सभागृहात पोहचले. वरीष्ठ अधिकार्‍यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात याविषयीची वाळू तस्कर आणि तलाठ्यांमधील ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीप असणारा पेन ड्राईव्हच आमदार जयकुमार गोरेंनी सभागृहात सादर केला. दोषी अधिकारी आणि वाळू तस्करांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्‍नही त्यांनी लक्षवेधीद्वारे विचारला. त्यावर या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
माण तालुक्यात वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. माणगंगा नदीचे पात्र वाळू तस्करांनी कुरतडून टाकले आहे. अशीच स्थिती खटाव तालुक्यातील येरळा नदीची आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या डोळ्यासमोरून राजरोसपणे वाळूवाहतुक सुरू असते. वाळू व्यवसायामुळे पद, प्रतिष्ठा सर्व काही मिळत असल्याने गावोगावच्या अनेक तरुणांचा ओढा या व्यवसायाकडे आहे. या व्यवसायाला जोडून गुंडगिरी, दहशतवाद वाढीस लागण्याबरोबर अनेक गावातील समाजकारण, राजकारण नासवले गेल्याची चर्चा होते. याबाबत प्रसिद्धी माध्यमांमधून आवाज उठवला की थातुरमातुर कारवाईचे नाटक केले जाते. व नंतर अधिकार्‍यांच्या कृपेने पुन्हा जोमात वाळूतस्करी सुरु होते. तस्करांकडून वरिष्ठ अधिकार्‍यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात याबाबतची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीपच व्हायरल झाली होती. प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवल्यावर पाच तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील बडे मासे मात्र मोकाट सुटले होते. आमदार जयकुमार गोरे यांनी अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडताना त्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लीपचा पेन ड्राईव्हच विधीमंडळात सादर केला. यावेळी मोठ्या वाळू व्यावसायिक कारवाई होत नाही ‘ते’ सरकारचे जावई आहेत का ?असा संतप्त सवालही उपस्थित केला. या लक्षवेधीवर उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पेन ड्राईव्ह संभाषणात तस्कर बोलत आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करुन कारवाई करु. चौकशीसाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक केली जाईल. तहसीलदारांच्या विरोधात पुरावे असतील तर त्यांच्यावर तसेच वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे अश्‍वासन त्यांनी दिले. वाढत्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी करत पाच तलाठ्यांचे निलंबन केले होते. मात्र, याप्रकरणातील काही अन्य वरिष्ठ अधिकारी गुंतलेले असून त्यांना व वाळू तस्करांना वाचवले जात असल्याची चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात आहे.

No comments:

Post a Comment