Ticker

6/recent/ticker-posts

माण तालुक्यातील पाच तलाठी निलंबित

प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांची कारवाई

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
माण तालुक्यात होत असलेल्या वाळू उपशात वाळू माफियांना अभय देणार्‍या महसूल विभागातील साफसफाईला सुरुवात झाली असून तालुक्यातील माणगंगा नदीकाठच्या पाच गावातील तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये वाकी, खडकी, मार्डी, वरकुटे म्हसवड तसेच जांभूळणी येथील तलाठ्याचा समावेश असून शुक्रवारी उशिरा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. निलंबनाच्या कारवाईने महसूल विभागातील अनेकांचे धाबे दणाणले असून ‘वाळू’ या शब्दाचा धसका अनेकांनी घेतला आहे. दरम्यान, माण तालुक्यात दोन दिवसांपासून ‘सत्य सह्याद्री’च्या वृत्ताचा बोलबाला असून तालुक्यातील वाळू वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याबाबत दैनिक सत्य सह्याद्रीने महत्त्वाची भूमिका घेतली होती. सातत्याने यासंदर्भात सातत्याने वार्तांकन करण्यात येत होते. तरीही महसूल विभागातील वरिष्ठांनी याकडे कानाडोळा केला होता. मात्र, शेवटी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ठोस भूमिका घेत थेट प्रांत, तहसीलदार, तलाठ्यांना नोटिसा बजावत तहसिलदारांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे आता कोणाचा नंबर लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
शनिवारच्या सत्य सह्याद्रीच्या अंकात याबाबातचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यातच माफियांची पाठराखण करणार्‍या अनेकांनी ही बातमी चुकीची आहे, अशी कोल्हेकुई देखील सुरु केली होती. शिवाय अनेकांनी ‘उचलबांगडी’ या शब्दावर आक्षेप घेतला तर काहीजणांनी तहसीलदार येवले रजेवर गेले आहेत, बदली झाली आहे, अशा बाता मारल्या. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिरा प्रांतांनी पाच तलाठ्यांना निलंबित केल्याने ‘सत्य सह्याद्री’च्या नावाने बोटे मोडणार्‍यांची तोंडे बघण्यासारखी झाली होती.

हे तलाठी झाले निलंबित

वाकी येथील तलाठी एस. एन. ढोले, खडकी येथील तलाएी एस. व्ही. बडदे, मार्डी येथील तलाठी वाय. बी. अभंग, वरकुटे-म्हसवड येथील तलाठी जी. एस. म्हेत्रे, जांभुळणी येथील तलाठी बी. एस. वाळके यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले असून या सर्वांनी नेमून दिलेल्या कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला असून गंभीर स्वरुपाचे दोषारोप असल्याने आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिवाय मंडलाधिकारी के. पी. शेंडे पथकप्रमुख यांच्यासमवेत चुकीचा अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे नमूद करत निलंबन करण्यात आले आहे. निलंबन काळात या सर्व तलाठ्यांचे मुख्यालय हे खटाव तहसील कार्यालय ठेवण्यात आले आहे.

तडजोड भोवली

या सर्व तलाठ्यांनी वाळूमाफियांशी तडजोड केल्यानेच या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. दरम्यान, पाच तलाठी निलंबित होण्याची माण तालुक्याच्या इतिहासातील ही पहिली कारवाई आहे. शिवाय गेल्या 23 फेब्रुवारीपासून वाळूवाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

नदीचे पंचनामे

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे माणगंगेच्या वाळू उपशाला तूर्तासतरी चाप लागला असून महसूल विभागाची साफसफाई झाली आहे. शिवाय महसूलचे अनेक अधिकारी, कर्मचारी माणगंगेकडे पाठवण्यात आले असून त्यांच्याकडून नदीपात्रातील वाळूच्या खड्ड्यांचे पंचनामे सुरु आहेत. संपूर्ण पंचनामे झाल्यावर आणखी कोणाकोणावर कारवाई होणार याकडेही सार्‍या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments