संदीप कुंभार
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी: येथील सद्. यशवंतबाबा महाराज यांच्या रथोत्सव यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस असून या रथोत्सव यात्रेनिमित्त विविध वस्तूंची दुकाने तसेच मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले असले तरीही जातिवंत खिल्लारी जनावरांची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या यात्रेस जनावरांची उणीव मात्र जाणवत आहे. तब्बल दोन वर्षांनी मायणी नगरी गजबजून गेली असून नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती,वडूज ग्रामपंचायत मायणी, यात्रा कमिटी व श्री सद्गुरु यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट, मायणी यांच्या वतीने मायणी येथील श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या 93 व्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 22 ते 31 मार्चअखेर आयोजित यात्रेस अत्यंत उत्साहाचे व धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला आहे. सोमवारी 28 रोजी रथ सोहळ्याचा मुख्य दिवस आहे.
या निमित्ताने दि. 23 रोजी श्री सद्गुरू यशवंत बाबांची पालखीतून मिरवणूक निघाल्यानंतर भंडारा व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दि. 28 मार्च रोजी श्री सद्गुरु यशवंत बाबा यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्याहस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे यांचे प्रमुख उपस्थितीत रथपूजन होणार आहे.
यात्रेनिमित्ताने श्री सद्गुरु यशवंत बाबा यांच्या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस चालणार्या यात्रेमध्ये मेवामिठाई ,खेळणी, पाळणे आदी अनेक स्टॉल्स उभे करण्यात आले आहेत. प्रतिवर्षी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरवण्यात येतो व मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणाला जनावरे दाखल होत असतात व त्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र यावर्षी सतत चा दुष्काळ व गेल्या दोन वर्षापासून असलेले कोरोनाचे सावट यामुळे या जातिवंत जनावरांची यावेळी उणीव जाणवत आहे.
दि. 24 ते 29 मार्च अखेर प्रदर्शनासाठी जनावरांची नोंद केली जाणार आहे. दि. 26 रोजी शेणखताचा जाहीर लिलाव व दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता जनावरांचे प्रदर्शन व दुपारी तीन वाजता बक्षीस समारंभ या पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.

0 Comments