आमदार गोरेंबाबत माणचे पुढारी गप्प का? - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, April 25, 2022

आमदार गोरेंबाबत माणचे पुढारी गप्प का?

शिवसेना  उपजिल्हाप्रमुख संजय भोसलेंचा सवाल

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
आमदार जयकुमार गोरे यांच्यावर दाखल गुन्हे प्रथमदर्शनी गंभीर असून याबाबत माण तालुक्यातील त्यांचे आमदारकीचे प्रतिस्पर्धी जे कायम गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतात, त्यांच्याकडून अशा गंभीर प्रकरणी एक चकार  शब्दही निघाला नाही, अशी खंत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आमदार जयकुमार गोरे यांचेवरील गुन्हे खरे किंवा खोटे हे तपासाअंती न्यायालयात सिध्द होईल. परंतु, यातील कायद्याचा भाग पाहता तपास यंत्रणानी कोणताही पक्षपातीपणा न करता कोण आमदार, खासदार,मंत्री व बाकी सामान्य हे न पाहता आतापर्यंत  आरोपी अटक करुन तपास व्हायला हवा होता. यामध्ये कोठे माशी शिंकते आहे का? अशा शंकांना वाव राहायला नको, याची खबरदारी घेताना पोलीस दिसून येतात का? हाच खरा प्रश्‍न आहे अशांमुळेच पोलिसांवरील जनतेचा विश्‍वास कमी होताना दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 निवडणुकांच्या धामधुमीत  कोण कसा व किती वाईट हे दाखविण्यासाठी रस्सीखेच सुरु असते. जनतेला उल्लू बनवत प्रतिस्पर्ध्यांच्या काढल्या जाणार्‍या कुंडल्या आणी दावे प्रतिदावे कितपत खरे असतात, याला जनता पुरती ओळखून आहे. एकमेकांच्या  नावाने नुसते ढोल बडवले जातात. परंतु, विरोधी नेत्यांवरती प्रत्यक्षात सामान्य नागरिकाला त्यांचेवरती झालेल्या अन्याय अडवणूक, पिळवणूक तसेच फसवणुकीबाबत गंभीर गुन्हे दाखल करावे लागले की तेरी भी चूप, मेरी भी चूप या म्हणीप्रमाणे माणचे पुढारी गप्प का असतात किंवा यांना कोणता साप चावतो की काय? असा जहरी सवाल भोसले यांनी केला.
दरम्यान, पेड न्यूजसाठी धडपडणारे आणी रकानेच्या रकाने भरणारे माणमधील काही पत्रकार (सत्य सह्याद्रीचे नव्हेत) देखील याला अपवाद नाहीत. सामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर आवाज उठविताना अशा बहाद्दरांची एकतर शाई सुकलेली असते कुणी लिहलेच तर ते प्रसिध्दच होऊ नये यासाठीची धडपड करणारे अशांमुळेच सामान्यांना कुठला आलाय न्याय, अशी खंतही भोसले यांनी व्यक्त केली.  न्याय हा घटनेने दिलेला सामान्य नागरिकांचा हक्क आहे.  माणूस कितीही मोठा असो खर्‍याला न्याय मिळायला हवा. परंतु, गुन्हा खोटा असेल तर कोणाची बदनामी व त्यांना नाहक त्रास होता कामा नये ही कायद्यातील तपास यंत्रणाची जबाबदारी आहे, असे मतही भोसले यांनी शेवटी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment