पाणीप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना डॉ. येळगावकरांचे निमंत्रण - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, April 18, 2022

पाणीप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना डॉ. येळगावकरांचे निमंत्रण

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: 
पाणीप्रश्‍नावर सातत्याने लढा उभारणारे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी जलसंपत्ती दिनाचे औचित्य साधून खटाव-माणच्या पाणीप्रश्‍नी एकत्र जमण्याचे निमंत्रण खटाव-माण तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना धाडले आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरेंसह सर्व नेत्यांनी मोठ्या मनाने बैठकीस यावे, असे आवाहन डॉ. येळगावकर यांनी सोशल मीडियावरून केले आहे.
खटाव माणसाठी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी असलेल्या उरमोडी, जिहे-कठापूर, टेंभू उपसा सिंचन, तारळी उपसा सिंचन, ब्रह्मपुरी सिंचन या योजनेतून खटाव-माणच्या वंचित राहिलेल्या भागासाठी शेती व पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक दि. 24 एप्रिल रोजी सातारा येथील सर्किट हाऊस येथे घेण्याचे नियोजन डॉ. येळगावकर यांनी केले असून दुपारी 3 वाजता एकत्र जमावे, असे आवाहन त्यांनी या पत्रकातून केले आहे.
हा आहे बैठकीचा मुख्य उद्देश
उरमोडी योजनेद्वारे आठमाही पाणी मिळवण्यासाठी, जिहे-कठापूर योजनेचे आठमाही पाणी आंधणी धरणातून माणच्या उत्तर भागातील 32 गावासाठी, नेरमधून दरूज, दरजाईसह सातेवाडी पेडगावसह एनकूळ कणसेवाडीसह 15 गावांना पाणी मिळवण्यासाठी तसेच टेंभू योजनेचे पाणी मायणी, कलेढोणसह 16 गावांना व माण तालुक्यातील वरकुटे-मलवडीसह, कुकुडवाड शेनवडीसह 18 गावांना सिंचनासाठी आणि पिळ्यासाठी मिळवण्यासाठी  आणि तारळीचे आठमाही पाणी मिळवून वंचित भागाचा समावेश करण्यात यावा, ब्रह्मपुरी योजनेचे पाणी औंधसह वंचित 16 गावांना मिळवण्यासाठी बैठकीत विचार विनिमय करुन पुढी दिशा ठरवणे हा बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.
यांना आहे निमंत्रण
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, शेखर गोरे राहूल पाटील, टी. आर. गारळे, प्रदीप विधाते, डॉ. संदीप पोळ, संजय भगत, डॉ. सुरेश जाधव, अनिल पवार, संजय साळुंखे, संजय भोसले, रफिक मुलाणी, माण-खटावचे सभापती, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, आरपीआय, वंचित आघाडी, सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
बैठकीकडे लक्ष
खटाव-माणच्या इतिहासात अशाप्रकारे पाणीप्रश्‍नावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची पहिलीच वेळ आहे. अनेकवेळा अनेक नेत्यांनी आपापल्या राजकीय भाषणांमध्ये सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन पाणीप्रश्‍नी लढा देण्याचे आवाहन केले होते. आता डॉ. येळगावकर यांनी थेट पुढाकार घेत 24 रोजी ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

1 comment:

  1. डॉक्टर येळगावकर यांचे मनापासून अभिनंदन!

    ReplyDelete