अपघातानंतर ग्रामस्थांची म्हसवड पोलीस ठाण्यावर धडक, मोठा तणाव
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड: पुळकोटी, ता माण गावच्या हद्दीत जांभुळणी गंगोती रस्त्यावर चोरटी वाळू वाहतूक करणार्या डंपरने जोरदार धडक देत दुचाकी चिरडली. या अपघात झालेल्या अपघातात पाणवण येथील तीन कॉलेजचे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चोरटी वाळू वाहतूक करणार्या डंपर चालकावर व मालकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संतप्त पाणवन ग्रामस्थांनी म्हसवड पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस ठाण्याच्या आवारातच तहसीलदार सूर्यकांत येवले यांना घेराव घातला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पाणवनकडून देवापूर येथे दुचाकी क्र. एमएच 42 एन 5201. वरून कॉलेजला निघालेल्या विकास राधाप्पा नरळे, सुधीर शामराव शिंदे, व शुभम दादासाहेब चव्हाण (सर्व राहणार पाणवन) यांना पुळकोटी कडुन जांभुळणी कडे चोरटी वाळु वाहतुक करणारा डंपर क्र एमएच 11 एएल 4845 ने गंगोती फाट्यावर धडक दिली. धडकेनंतर काही अंतर दुचाकी फरपटत गेली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. यातील विकास नरळे यास पुढील उपचाराकरीता अकलुज येथे नेण्यात आले आहे.
अपघात झाल्यानंतर डंपर चालक प्रविण हुबाले हा वाळु भरलेला डंपर अपघात स्थळीच सोडून फरार झाला. दरम्यान, यावेळी ग्रामस्थांनी म्हसवड पोलिसांना खबर देऊन घटनास्थळी बोलवले असता पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल वाघमोडे व कुदळे हजर झाले होते. मात्र संतप्त ग्रामस्थानी गोंधळ घातल्याने सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
अपघातातील डंपर पंचनामा न करता हलवला, असा आरोप करत भरलेला डंपर वनीकरणात रिकामा करून मोकळा डंपर पोलिसांनी कसा आणला या मुद्द्यावरून चौकशी साठी आलेल्या तहसीलदार येवले यांच्या गाडीला घेराव घातला होता यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे वाळू व्यवसायाला नेमके अभय कोणाचे? अशी चर्चा घटनास्थळी होती.


0 Comments