चप्पल स्टँडमध्ये चावी ठेवणे पडले तीन लाखांना, कोडोलीत चोरट्यांनी आरामात घर लुटले - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, October 8, 2022

चप्पल स्टँडमध्ये चावी ठेवणे पडले तीन लाखांना, कोडोलीत चोरट्यांनी आरामात घर लुटले


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
  चंदननगर कोडोली येथील पुष्पकुंज रेसिडेन्सी या वसाहतीतील एका नागरिकाला घराबाहेर चप्पल स्टँडमध्ये चावी ठेवणे चांगलेच महागात पडले असून या चावीने दरवाजा उघडून फ्लॅटमध्ये शिरून तब्बल तीन लाखांची लूट करून अज्ञात चोरटे आरामात निघून गेले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भगवान शामराव पाटील (वय 41, रा. टी 3, पुष्पकुंज रेसिडेन्सी, चंदननगर कोडोली) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी दुपारी पावणेबारापूर्वी पाटील हे बाहेर गेल्यानंतर तेव्हापासून सायंकाळी सहाच्या दरम्यान, पाटील यांच्या फ्लॅटच्या दरवाजाबाहेर असलेल्या चप्पल स्टँडमधील लेडीज स्पोर्ट शूजमध्ये ठेवलेली चावी काढून फ्लॅटचा दरवाजा उघडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाटामधील ड्रॉव्हरला असलेल्या चावीने ड्रॉवरचे लॉक उघडून साडेसात हजार रुपये रोख रक्कम, 69 हजार 500 रुपये किंमतीचा अडीच तोळे वजनाचा राणीहार, 55 हजार रुपये किंमतीचा दोन तोळे वजनाचा लक्ष्मीहार व 1 लाख 11 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्याची पूर्ण पट्टी असलेले चार तोळ्यांचे मंगळसूत्र, 23 हजार 200 रुपये किंमतीची सोन्याची चेन व 27 हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण असा असा 2 लाख 94 हजार 800 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
भरदिवसा चोरट्यांनी आपला कार्यभाग साधूनही शेजारच्यांना काहीही समजले नाही. पाटील यांना मात्र, डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. सणासुदीच्या काळात चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून अशा घटनांमधून नागरिकांनी बोध घेणे गरजेचे आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. मोरे करत आहेत.

No comments:

Post a Comment