दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू, पती गंभीर - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 10, 2022

दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू, पती गंभीर

सत्य सह्याद्री/ रहिमतपूर
रहिमतपूर-औंध रस्त्यावर पिंपरी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत खडवी शिवारातून जाणार्‍या डांबरी रस्त्यावर म्हैस आडवी आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पुनम दीपक साष्टे (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती पुणे) या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचे पती दीपक साष्टे हे गंभीर जखमी झाले. याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात पुनम यांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती दीपक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलीस नाईक सागर सुभाष पाटील यांनी फिर्याद दिली. मंगळवारी 4 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी होमगार्ड भास्कर घाडगे यांनी खबर दिली होती. साष्टे दाम्पत्य दुचाकीवरून भरधाव वेगात औंधच्या दिशेने निघाले होते. अचानक म्हैस आडवी आल्याने म्हशीला धडकून त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात पुनम यांचा मृत्यू झाला तर दीपक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत शनिवारी गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. खुडे करत आहेत.

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी खटावच्या युवकावर गुन्हा
खटाव: टॉवर का बंद केला, अशी विचारणा केल्याने मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी खटाव येथील संदीप अशोक काटकर याच्याविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सुमित सर्व्हिसेस कंपनीचे प्रतिनिधी सागर सुरेश कुंभार (वय 37, रा. केसरकर पेठ, सध्या रा. रहिमतपूर) यांनी फिर्याद दिली. सागर व कंपनीचे टेक्निशियन सोमनाथ भोसले हे खटाव येथे गेले असताना टॉवर का बंद केला, अशी विचारणा केल्याने चिडून जाऊन संदीप काटकर याने सागर व सोमनाथ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली तसेच तुम्ही खटाव येथून कसे जाता? अशी धमकी देऊन रस्ता आडवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास हवालदार एम. एस. भोसले करत आहेत.

हणमंतवाडीत मोटार चोरी, तिघांवर गुन्हा
फलटण: हणमंतवाडी, ता. फलटण येथील शेतातील विहिरीवरून 7 हजार रुपयांची इलेक्ट्रीक मोटार चोरी केल्याप्रकरणी तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कल्याण धाईंजे (वय 19) मुन्ना मणेर (वय 24) विनोद जाधव (वय 17, सर्व रा. हणमंतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून अशोक साहेबराव निंबाळकर (वय 53, रा. शिंदेनगर, फलटण) यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार सूर्यवंशी करत आहेत.

अहिरे कॉलनीतून युवती बेपत्ता
सातारा: येथील अहिरे कॉलनीतून 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.

यवतेश्‍वर येथील युवक बेपत्ता
सातारा: यवतेश्‍वर, ता. सातारा येथील ॠषीकेश लक्ष्मण पाटेकर (वय 26) या युवक सातार्‍यातील नवीन एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला असलेल्या एकाकडे भावाच्या गाडीची चावी देऊन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलीस नाईक अवघडे करत आहेत.

धकटवाडीची युवती वडूजमधून बेपत्ता
वडूज: वडूज येथे कॉलेजला जाते असे सांगून गेलेली धकटवाडी, ता. खटाव येथील 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी वडूज पोलीस ठाण्यात नोंदवली असून तपास पोलीस नाईक कदम करत आहेत.

वडूज येथून युवक बेपत्ता
वडूज: येथील नवीन रामचंद्र दीक्षित (वय 45) हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने पत्नीने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. दि. 29 सप्टेंबर पासून पेडगाव रस्त्यावरील राहत्या घरातून बाहेर जाऊन येतो, असे सांगून निघून गेला असून सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याचे त्याची पत्नी रजनी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास हवालदार ओंबासे करत आहेत.

दोन दुचाकींच्या धडकेत एकजण गंभीर
मेढा: सोनगाव, ता. जावली, जि. सातारा गावच्या हद्दीतील मेढा-कुडाळ रस्त्यावर एका दुचाकीस दुसर्‍या दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्रेयश बाळू शिंदे (वय 20) हा युवक गंभीर जखमी झाला तर पाठीमागे बसलेला गणेश काटकर हा किरकोळ जखमी झाला. गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रदीप मधुकर शिंदे (रा. सोनगाव) याच्याविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुरुवारी 6 रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा अपघात घडला. तपास आर. टी. शेख करत आहेत.

ताथवडा येथून मोटार चोरी
फलटण: ताथवडा, ता. फलटण येथून 10 हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रीक मोटार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजयकुमार एकनाथ शिंदे (वय 55, रा. ताथवडा) यांनी याबाबत फिर्याद दिली. तपास पोलीस नाईक ए. एस. काशिद करत आहेत.

दुचाकीच्या धडकेत युवक ठार
कराड: ट्रिपल सीट प्रवास करताना पुढील दुचाकीस धडकून खाली पडून आगाशिवनगर, ता. कराड येथील अजय अनिल निकम (वय 28) याचा मृत्यू झाला. याबाबत आकाश मोहन माने (वय 29, रा. मानेगाव, ता. पाटण) यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास मानेगाव गावच्या हद्दीत ढेबेवाडी-कराड रस्त्यावर दरवेशी वस्तीनजीक हा अपघात घडला. अजय चालवत असलेल्या दुचाकीवर व अन्य दोघेजण होते. अजयची दुचाकी आकाश यांच्या दुचाकीला धडकून अपघात झाला. याबाबत मृत युवकावर स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक तलवार करत आहेत.

कराडला बुरुड गल्लीतून दुचाकीचोरी
कराड: शहरातील बुरुड गल्ली, शनिवार पेठ येथून राहत्या घरासमोर पार्क केलेली 10 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार जनार्दन महादेव शिंदे (वय 58) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलीस नाईक पवार करत आहेत.

मठाचीवाडीत घरफोडी, 75 हजारांवर डल्ला
फलटण: मठाचीवाडी, ता. फलटण येथे घराचा ढकललेला दरवाजा उघडून घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार ॠषीकेश गौतम शेलार (वय 30) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमासह ढकलेला दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला एक तोळा सोन्याची चेन, अर्ध्या तोळ्याची मोहनमाळ, लेडीज अंगठी, कर्णफुले, चांदीचे पैंजण, जोडवी, डिजीटल घड्याळ व साडेपाच हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. अधिक तपास हवालदार साबळे करत आहेत.

आंधळीत विनाकारण एकास मारहाण
गोंदवले: आंधळी, ता. माण येथे विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी मल्हारी सत्यवान चव्हाण व लाला किसन चव्हाण या दोघांच्या विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भीमराव शिवाजी शेंडे (वय 44) यांनी फिर्याद दिली. दि. 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंधळी येथील प्रथमेश पवार यांच्या चहाच्या टपरीवर भीमराव व त्यांची पत्नी चहा पीत असताना संशयितांनी काही कारण नसताना दांडक्याने भीमराव यांच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण केली. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जखमी झालेल्या भीमराव यांनी औषधोपचार घेऊन शनिवारी याबाबतची फिर्याद नोंदवली. तपास सहायक फौजदार पी. जी. हांगे करत आहेत.

बेदरकारपणे रिक्षा चालवल्याने गुन्हा
कराड: मलकापूर गावच्या हद्दीत महामार्गवर बेदरकारपणे रिक्षा चालवून स्वत:च्या व प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी अमर सतीश भंडारे (रा. बहे, ता. वाळवा) या रिक्षाचालकाविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे कॉनस्टेबल जयसिंग रमेश काटे यांनी फिर्याद दिली. तपास हवालदार एस. बी. पाटणकर करत आहेत

No comments:

Post a Comment