दहिवडी : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे पत्र देताना प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, बाळासाहेब सावंत, सुरेंद्र मोरे, महेश जाधव आदी मान्यवर. ( छायाचित्र नवनाथ भिसे )
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले : पेन्शन, उपकार नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाचा आधार आणि हक्क आहे असे स्पष्ट प्रतिपादन माजी कोकण आयुक्त व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले. तसेच राष्ट्रवादी पक्ष सर्व सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांसोबत असून आमचा जुनी पेन्शन लागू करण्याच्या तसेच इतर मागण्यांना पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले.
आज दहिवडी येथे बाजारात पटांगणापासून बसस्थानक मार्गे तहसील कार्यालयावर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाला माणच्या राष्ट्रवादीकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. या पाठिंब्याचे निवेदन तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे यांना दिल्यानंतर श्री देशमुख मोर्चात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसमोर मनोगत व्यक्त केले.
श्री देशमुख म्हणाले, जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वयस्करपणात जगण्यासाठी निश्चित रक्कम दिली जात होती. तसेच जी.पी.एफ., ग्रेज्यूटी व कर्मचारी मृत्युनंतर कुटुंबाला निवृत्तीवेतन दिले जात होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे. या मागणीचा सकारात्मक निर्णय घ्यावा. कारण आयुष्यातील उमेदीची वर्षे कर्मचाऱ्यांनी नोकरीत दिलेली असतात. नोकरी करताना त्यांनी आपली पुर्ण क्षमता तिथे वापरलेली असते. त्यामुळे पेन्शन हीच कर्मचाऱ्यांना म्हातारपणासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे पेन्शन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यासाठी कर्मचारी आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. नवीन पेन्शन योजना नसून केवळ गुंतवणूक आहे. कर्मचाऱ्यांवर ही योजना अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांना न्याय द्यावा व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, नगरसेवक सुरेंद्र मोरे व महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments