सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले : वावरहिरे ता.माण येथे एका शाळकरी मुलाचे अपहरण करताना तो प्लॅन फसल्याची घटना आज सकाळी घडली. किडनॅपर्सच्या हाताला चावून शाळकरी मुलगा त्यांच्या तावडीतून सुखरूप निसटला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रतिक अशोक जाधव,इ.७वी(वय.१३ वर्षे,रा.जाधववाडा-वावरहिरे) हा मुलगा सकाळी गावातील पाणलिंग विद्यालयात येत असताना त्यास शाळेत सोडण्याच्या बहाण्याने तोंडाला काळा स्कार्फ बांधलेल्या ४ अनोळखी इसमांनी चारचाकी गाडीत बसवले व त्याच्या तोंडाला रुमाल लावत त्याला भूलीचे औषध देण्याचा प्रयत्न केला. गाडी शाळेकडे न जाता दहिवडीच्या दिशेने भरधाव सुटली. दैव बलवत्तर म्हणून प्रतिकला भूल न चढल्यामुळे त्यामुळे त्याने आरडाओरडा सुरू केला. गाडीतील मुलाचा आरडाओरडा ऐकून संशय आल्याने आठवण ढाब्याजवळ काही दुचाकीस्वारांनी त्या चारचाकी गाडीला आपल्या गाड्या आडव्या लावून थांबवले.
यावेळी दुचाकीस्वार व अपहरण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींमध्ये बाचाबाची सुरू झाली. या संधीचा पूरेपूर फायदा प्रतीकने उठवत अपहरणकर्त्या अज्ञात व्यक्तीच्या हाताला चावा घेत गाडीचा दरवाजा उघडून वावरहिरे घाटातील डोंगरातून,काट्याकुट्यातून वाट काढत तडक शाळा गाठली. शाळेत पोहचल्यानंतर त्याने सदरचा सर्व प्रसंग शिक्षकांना कथन केला.
शिक्षकांनी लगेच ग्रामस्थांशी व गावच्या पोलिस पाटील भारती भोसले संपर्क साधला. मिळालेल्या माहितीवरुन व शिक्षकांच्या सांगण्यावरून ग्रामस्थ व पोलीस पाटलांनी गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले,परंतु दुर्दैवाने या घटनेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीचा नंबर दिसून आला नाही. या घटनेमुळे वावरहिरे येथे शाळेसाठी येणाऱ्या पंचक्रोशीतील व शिंगणापूर परिसरातील विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच अपहरण प्रकरणातील संशयित नेमके कोण? प्रतिकचे अपहरण कोणत्या हेतूने करण्यात आले? याबाबत ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.
रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे.
आपले पाल्य शाळेत जात असताना आवश्यक ती जबाबदारी घ्यावी. विद्यार्थी पालक व नागरिकांनी घाबरून जावू नये. या सर्व गोष्टींचा छडा पोलीस लावतील. त्यामुळे घाबरून न जाता सतर्क रहावे.
----- अक्षय सोनवणे
सपोनि.दहिवडी पोलीस ठाणे
0 Comments