Hot Posts

6/recent/ticker-posts

ठेकेदाराकडून विहीर खोदकामात अतिक्रमण, जलजीवन जलमिशन योजनेत शासनाची फसवणूक

सत्य  सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले : ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी व ग्रामपंचायत येळेवाडी यांच्या सहकार्याने विहीर खोदकामात ठेकेदाराने अतिक्रमण केल्याचा आरोप रासप नेते शिवाजी बरकडे यांनी केला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पाणी पुरवठा उप अभियंता व संबंधित ठेकेदार तसेच ग्रामपंचायत येळेवाडी यांच्या निदर्शनास आणून देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सदर घटनेची पाहणी केली. 
विहिरीचे काम हे गट नं.१५३मध्ये अपेक्षित असताना ते काम गट नं.१५७मध्ये झाले आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत व संबंधीत ठेकेदाराने शासनाची फसवणूक केली आहे,असा आरोप शिवाजी बरकडे यांनी केला आहे. मौजे येळेवाडी येथील जलजीवन जल मिशन योजनेअंतर्गत होणारी कामे ग्रामपंचायत व ठेकेदाराने संगनमत करत अतिक्रमण करून दुसऱ्या जागी केली आहेत. असेही शिवाजी बरकडे म्हणाले. याचबरोबर माण पंचायत समितीच्या पुरवठा प्रशासन आणि ठेकेदाराने केलेली फसवणूक निदर्शनास आणून देऊनदेखील गटविकास अधिकारी झोपेच्या सोंगात का आहेत? असा सवालही रासप नेते शिवाजी बरकडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच पाणी पुरवठा प्रशासन व ठेकेदार हे कोणाच्या दबावापोटी चुकीच्या पद्धतीने कामे करत आहेत? याचा उलगडा लवकरच करण्यात येणार असल्याचेही श्री.बरकडे यावेळी म्हणाले.
ठेकेदाराने पाणी पुरवठा विभागासह ग्रामपंचायत येळेवाडी यांच्या मदतीने विहिरीसाठी केलेले अतिक्रमण जनतेच्या समोर आणल्याने विहीर पूर्ण झालेला गट नं.१५७मध्ये नव्याने बक्षीसपत्र करून घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाला हाताशी धरत गट नं.१५३मधील मंजुरी रद्द करून ती गट नं.१५७ मध्ये करून घेणार असल्याची माहितीही बरकडे यांनी यावेळी दिली. ठेकेदार ,सरकारी कर्मचारी आणि ग्रामपंचायतिची ही दंडेलशाही कुणाच्या पाठिंब्यामुळे सुरू आहे, असा घणाघाती सवालही बरकडे यांनी उपस्थित केला. संबंधित बोगसगिरीच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने चौकशी करत १५ दिवसाच्या आत कारवाई करावी अन्यथा येळेवाडी ग्रामस्थांसह माण पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशाराही रासपचे जेष्ठ नेते शिवाजी बरकडे यांनी यावेळी दिला आहे.

Post a Comment

0 Comments