Hot Posts

6/recent/ticker-posts

वाईत मराठा क्रांती मोर्चाच्या साखळी उपोषणाला शहर व 138 गावांचा पाठींबा

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

वाई ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वाई तालुका मराठा क्रांती मोर्च्याने पाठींबा दर्शवत सरकारच्या आरक्षण धोरणा विरुद्ध साखळी उपोषणाने एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने सरकार विरोधी लढा देण्याचा निर्धार वाई मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यकांनी 'सत्य सह्याद्री' च्या प्रतिनीधीशी बोलताना व्यक्त केला.


वाई शहरासह संपूर्ण  तालुक्यातील 138 गावातील मराठा समाज बांधवांनी वाई तहसील कार्यालयासमोर गाव निहाय साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. पहिल्या दिवसापासूनच उस्फुर्तपणे हजेरी लावत मराठा आरक्षण हक्कासाठी राज्य सरकार विरोधात संपूर्ण वाईकर मराठा एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले. सर्व राजकीय पक्षातीलकार्यकर्ते पक्ष निष्ठा बाजूला ठेवत उपोषणात सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणून गेला होता.

मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच मराठा समाज बांधवांवर उपोषणाची वेळ आली आहे, अशी भावना वाई तालुक्यातील मराठा बांधवांकडून व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या ध्येय धोरणामुळे पात्रता असूनही मराठा समाजा मधील शैक्षणिक व नोकरी क्षेत्रात अन्याय होत आहे, आर्थिक दृष्ट्या पूर्णतः मागासलेला असताना मराठा तरुणांवर अन्याय होत त्यामुळे अनेकदा आत्महत्या होत आहेत याचे कसलेही सोयरसुतक राज्य सरकार व मराठी नेत्यांना नाही आरक्षण मिळावे म्हणून मराठयांनी अनेक मोर्चे व उपोषणे केली. परंतु, एकाही मराठा नेत्याने याला पाठींबा दिला नाही किंवा कसलेही भाष्य केले नाही याचे उत्तर राजकिय नेत्यांना येणाऱ्या काळात द्यावे  लागणार आहे. मराठा समाजाच्या मतावर आपली पिढ्यानपिढ्या राजकिय सत्ता काबीज करणारे राजकिय नेते मराठा आरक्षण विषयी मुख गिळून गप्प बसले आहेत. सत्तेच्या मोहापायी मराठा समाजाला वाऱ्यावर सोडून देण्यात धन्यता मानत आहेत. सरकारच्या विरोधात एकही शब्द बोलत नाहीत याची जाणीव संपूर्ण मराठा समाज बांधवांना झाली आहे. म्हणूनच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही. जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी कुणाचीही वाट न बघता वाई मराठा क्रांती मोर्चा जरांगे पाटील यांच्या सोबत शेवटपर्यंत रहाणार असल्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्च्याने केला आहे.

Post a Comment

0 Comments