पांगरी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 11, 2024

पांगरी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले :
माण तालुक्यातील पांगरी येथील ऋषिकेश संतोष जगदाळे वय अंदाजे 18 वर्षे या तरुणाने मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या साह्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत ऋषिकेश जगदाळे याचे वडील सातारा येथील सिविल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्याकडे आज मंगळवारी मृत ऋषिकेश याची आई गेली असता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सातारला गेलेल्या आईने घराबाहेर असलेली शेळी घरात बांधण्यासाठी त्यास फोन केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. 
त्यामुळे त्याच्या आईने शेजाऱ्यांना फोन करून याबाबत कळवले असता त्यांनी ऋषिकेश यास आवाज दिला. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांना आढळून आला.
खासगी रुग्णवाहिकेमधून त्यास शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत दहिवडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment