आ. दीपक चव्हाण , संजीवराजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, October 13, 2024

आ. दीपक चव्हाण , संजीवराजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार


फलटण प्रतिनीधी:-राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व माजी पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी प्रवेश करणार आहेत. खा. शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे प्रवेश होणार असून यावेळी जाहीर सभा होणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फलटणमध्ये मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर महायुतीमध्ये असणार आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उद्या पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत.

फलटणमधील राजे गटाचे आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार असले तरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश होणार नसल्याने श्रीमंत रामराजे हे राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार असल्याचे निश्चित होत आहे. श्रीमंत रामराजे यांनी आपण मनाने कार्यकर्त्यांसोबतच राहणार असल्याची भूमिका बैठकीत जाहीर केली होती.

आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील पदाचा राजीनामा देऊन ‘तुतारी’ हातात घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, श्रीमंत रामराजे यांनी अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, यावेळी त्यांनी भाजपवर तसेच भाजप नेते व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तसेच रणजितसिंह यांनी हिंमत असेल अपक्ष लढवून दाखवावे, असे आव्हानदेखील रामराजे यांनी दिले होते.

लोकसभा निवडणुकीवेळी श्रीमंत रामराजे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजेच संपूर्ण राजे गटाने ‘तुतारी’ला समर्थन दिले होते. आता विधानसभेलाही ते ‘तुतारी’ हातात घेतील, अशी चर्चा फलटणमध्ये सुरू होती. आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत अनिकेतराजे व श्रीमंत विश्वजितराजे यांच्या प्रवेशाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

No comments:

Post a Comment