सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: वाई आणि पाटण मतदारसंघातील बंडखोरी सोडली तर जिल्ह्यात सहा मतदारसंघात दुरंगी लढती होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. जवळपास सर्वच मतदारसंघात किमान आठपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असले तरी दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढाई रंगणार आहे. सोमवारी चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारी सर्वच पक्षांच्या प्रचाराचे नारळ फुटणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात दोन सभा होणार आहेत.
सातारा मतदार संघात भाजपकडून शिवेंद्रसिंह भोसले रिंगणात असून त्यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) कडून अमित कदम नशीब आजमावत आहेत. अमित कदम हे नवखे उमेदवार असले तरी शिवेंद्रसिंह भोसले यांना ते घाम फोडणार असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कराड दक्षिणमध्ये यंदाची परंपरागत लढाई होत असून माजी मुख्यमंत्री व काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून डॉ. अतुल भोसले नशीब आजमावत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही उलटफेर होण्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी काँग्रेकडूनही विजयाचा दावा केला जात आहे.
कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांनाच उमेदवारी मिळाली असून यंदा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर मनोज घोरपडे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. यंदा महायुतीने या मतदारसंघात बंडखोरी रोखल्यामुळे तुल्यबळ लढत होणार आहे.
वाई मतदारसंघात महायुतीकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार्या मकरंद पाटील यांच्यासमोर एकेकाळच्या त्यांच्याच समर्थक असलेल्या अरुणादेवी पिसाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली असून येथील निवडणूकही दमदार होणार आहे. त्यातच महायुतीचे बंडखोर पुरुषोत्तम जाधव यांनीही शड्डू ठोकल्याने तिरंगी लढत कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शिवाय माजी आमदार मदन भोसले यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांनी निवडणूक रिंगणात उतरावे असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, त्यांनी ते धाडस केलेले नाही.
फलटणमध्ये अजितदादांकडून शरद पवारांच्या गटात उडी मारलेल्या दीपक चव्हाण यांनाच उमेदवारी मिळाली असून त्यांच्याविरोधात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. रामराजे नाईक-निंबाळकर वगळता त्यांचे सर्व सैन्य शरद पवार गटात गेले असून रामराजेंनी पत्ते उघड केलेले नाहीत. दुसरीकडे सचिन पाटील हे मूळचे भाजपचे असून त्यांच्यामागे खासदार रणजितसिंह निंबाळकर गटाची ताकद आहे. त्यामुळे यंदा फलटणची निवडणूक ही रंगतदार होणार आहे.
जिल्ह्यातील हायव्होल्टेज मतदारसंघापैकी एक असलेल्या माणमध्ये जयकुमार गोरे भाजपकडून दुसर्यांदा व एकूण कारकिर्दीत चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर यंदा खटाव तालुक्यातील रहिवाशी माजी आमदार प्रभाकर घार्गे हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून लढत आहेत. विशेष म्हणजे यंदा जयकुमार यांचे बंधू शेखर गोरे हे निवडणूक रिंगणात नसून येथे एकास एक लढत होत असल्याने व महाविकास आघाडीला बंडखोरी शमवण्यात यश आल्याने येथील फाईटही टफ फाईट होणार असल्याचे मानले जात आहे.
कोरेगाव मतदारसंघात याही वेळेस शिवसेनेचे महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. मागील वेळेस केवळ 6 हजारांच्या फरकाने शशिंकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. यंदा ते या पराभवाची परतफेड करणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दुसरीकडे पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर महेश शिंदेच आमदार होणार असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे.
पारंपरिक लढत असणारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाकडे पाहिले जाते. येथे नेहमीप्रमाणे शिवसेनेकडून शंभूराज देसाई रिंगणात असून यावेळी महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) पक्षाला गेल्यामुळे त्यांच्याकडून हर्षद कदम या नवख्या युवकाला उमेदवारी दिली गेली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व देसाईंचे पारंपरिक विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी शड्डू ठोकत बंडखोरी केल्याने पाटणमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तिरंगी लढतीत कोणाचा तोटा व कोणाचा फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
दरम्यान, आठ मतदारसंघापैकी निम्म्या म्हणजे चार जागा भाजप लढवत असून दोन ठिकाणी शिवसेना तर दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत शरद पवार गट सर्वाधिक पाच जागा लढवत असून काँग्रेस अवघी एक तर शिवसेना उबाठा 2 जागा लढवत आहे.
पाच चेहरे नवे
आठ मतदारसंघातील आठही विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात असले तरी यंदा विरोधकांनी पाच ठिकाणी नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. सातार्यातून अमित कदम, पाटणमधून हर्षद कदम, वाईतून अरुणादेवी पिसाळ, माणमधून प्रभाकर घार्गे तर फलटणमधून सचिन पाटील हे नवे चेहरे आखाड्यात आहेत. यातील प्रभाकर घार्गे यांनी यापूर्वी एकदा निवडणूक लढवली असून बाकी चौघेजण पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे हे नवे चेहरे यंदा जायंट किलर ठरणार का? याबाबतही मोठी उत्सुकता आहे.
No comments:
Post a Comment