सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या जामीन अर्जात मदत करून जामीन मिळवून देण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाच मागणीत सहभाग निष्पन्न झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम उर्फ डी. एल. निकम याच्यासह चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने जिल्ह्याच्या न्याय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
निकम याच्यासह खासगी इसम आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. 70/0, बीडीडी चाळ, वरळी मुंबई), व अन्य एक अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि. 3 डिसेंबर व 9 डिसेंबर रोजी विलासपूर येथील हॉटेल मानसी इन येथे हा प्रकार घडला. याच्या पडताळणीनंतर दि. 10 रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी 24 वर्षीय तक्रारदार पुणे जिल्ह्यातील असलेल्या युवतीने फिर्याद दिली आहे. सदर युवतीच्या वडिलांच्या जामिनाचा अर्ज सातार्यात दाखल असून त्यावर निर्णय घेण्यासाठी आनंद खरात व किशोर खरात यांनी दि. 3 रोजी धनंजय निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची व स्वत:साठी स्वखुशीने काय करायचे ते करा, असे म्हणून लाचेची मागणी केली.
फिर्यादी युवतीसोबत कोडवर्डमध्ये चर्चा
याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली असता आनंद खरात व किशोर खरात हे दोघे जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. शिवाय निकम यांनी स्वत:च्या गाडीतून येऊन पक्षकार युवती असलेल्या फिर्यादीची न्यायालयीन वेळेनंतर भेट घेतली.
सदर महिलेला त्यांच्या वाहनात बसून जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या विषयावर युवतीशी व आनंद खरात व किशोर खरातशी ‘एमएसईबी’ या कोडवर्डमध्ये चर्चा केली. तसेच निकम यांच्या सांगण्यावरूनच आनंद खरात व किशोर खरात लाच मागण्यासाठी आले होते. हे सिद्ध झाले तसेच दि. 10 रोजी तिसरा अनोळखी इसम निकम यांच्यासाठी लाच रक्कम स्वीकारण्याच्या तयारीने आला होता. त्याने पंचामार्फत रक्कम गाडीत आणून द्या, असे सांगून लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्याने या चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
न्यायव्यवस्थेला हादरे
अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल कटके करत आहेत. दरम्यान, न्याय क्षेत्रातही लाचखोरी बोकाळल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी सातार्यातील काही वकिलांनीही अशाच स्वरुपाच्या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. तेव्हा हा विषय फार चव्हाट्यावर आला नव्हता. त्यामध्ये अंतर्गत चौकशीही झाली होती. आता पहिल्यांदाच जिल्हा सत्र न्यायाधिशावर थेट लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याने न्यायव्यवस्थेला हादरे बसले असल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment