खटाव
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात आ. जयकुमार कमल भगवानराव गोरे यांना
संधी मिळताच माण - खटाव मतदारसंघ, कराड, फलटणसह जिल्ह्यात जल्लोष साजरा
करण्यात आला. सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या आ. जयकुमार गोरे
यांना मंत्रीपद मिळाल्याने दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला
आहे. दुष्काळी भागातील पाणीयोजनांच्या कामांना गती देण्याबरोबरच रस्ते, वीज
, पाणी अशी मूलभूत विकासकामे आता जलद गतीने मार्गी लागणार आहेत. आ.
गोरेंना मंत्रीपद मिळाल्याने दुष्काळी भागासह जिल्ह्यालाही विकासाचा बुस्टर
डोस मिळाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत माण - खटाव मतदारसंघातून आ.
जयकुमार गोरे ४९ हजार मतांनी विजयी झाले होते. सलग चौथ्यांदा विधानसभेवर
निवडून गेल्याने आ. गोरेंची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याची शक्यता
वर्तविण्यात येत होती. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता आ. गोरे यांना भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रीपदाची शपथ घेण्याविषयी फोन
आला. आ. गोरे मंत्री होणार असल्याचे समजताच माण - खटाव मतदारसंघ, फलटण,
कराडसह जल्लोष करण्यात आला.
माण तालुक्याला
यापूर्वी विधानसभेवर निवडून जात मंत्रीपदाची संधी यापूर्वी कधीच मिळाली
नव्हती. विधानपरिषदेचे आ. महादेव जानकर यांना युतीच्या सरकारमध्ये
मंत्रीपदाची संधी मिळाली होती. आ. जयकुमार गोरे प्रस्थापितांना धूळ चारुन
२००९ साली सर्वप्रथम अपक्ष निवडून येवून विधानसभेत पोहचले होते. त्यावेळी
त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. २०१४ साली ते कॉंग्रेसकडून
दुसऱ्यांदा आमदार झाले. २०१९ च्या निवडणूकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश
केला होता. त्यावेळी ते तिसऱ्यांदा आमदार झाले. नुकत्याच पार पडलेल्या
२०२४ सालच्या निवडणूकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवून ४९ हजार मतांच्या
फरकाने सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या आ. गोरेंनी माण - खटावसह
जिल्ह्यातील इतर मतदारसंघात भाजप वाढीसाठी केलेले काम आणि पक्षाचे इतर
उमेदवार निवडून आणण्यातही त्यांचा सहभाग असल्याची दखल भाजपाच्या
वरिष्ठांकडून घेण्यात आली. भाजप आमदारांच्या प्रगतीपुस्तकातही आ. जयकुमार
गोरे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे मंत्रीपद निश्चित मानले
जात होते.
आ. जयकुमार गोरे यांनी गेली पंधरा
वर्षे माण - खटावसह दुष्काळी भागातील पाणीयोजना मार्गी लावण्यासाठी केलेला
संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला आहे. आ. गोरेंनी
सुरुवातीपासून जिहेकठापूर, उरमोडी या पाणीयोजना हजारो कोटींचा निधी मिळवून
मार्गी लावल्या. उरमोडीचे पाणी मतदारसंघात गेल्या ११ वर्षांपासून येत आहे.
जिहेकठापूर योजनेचे पाणी दोन्ही तालुक्यात पोहचले आहे. आंधळी उपसा सिंचन
योजना नव्याने मंजूर करुन आणून त्यांनी ती विक्रमी वेळेत पूर्णही केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी टेंभू योजनेसाठी
फेरजलनियोजनातून अडिच टीएमसी पाणी उपलब्ध करुन घेतले आहे. या योजनेची
कामेही सुरु झाली आहेत. गेल्या १५ वर्षात दुष्काळमुक्तीसाठी त्यांनी तब्बल
साडेबारा हजार कोटींची निधी मिळवला आहे. येणाऱ्या तीन वर्षात मतदारसंघ
दुष्काळमुक्त करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. मतदारसंघात रस्त्यांचे
जाळे निर्माण करुन त्यांनी दळणवळण सुलभ केले आहे.
लाल मातीतील पैलवान असल्याने आव्हाने स्विकारण्यात ते कधीच कमी पडत
नाहीत. १५ वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणाची सुरुवात प्रस्थापितांविरोधात
केली होती. त्यानंतरही त्यांनी जिल्ह्यातील मात्तबर विरोधकांना अंगावर
घेऊनच राजकीय वाटचाल सुरु ठेवली. जिल्ह्यासह राज्यातील अनेक बड्या
नेत्यांनी आ. गोरेंना रोखण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्या सर्वांना पुरून
उरत त्यांनी विधानसभेच्या चार निवडणूका जिंकल्या आहेत. संघटन कौशल्याच्या
जोरावर त्यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी
केली आहे. भाजप जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी पक्षवाढीसाठी
उल्लेखनीय काम केले होते. जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून त्यांनी सहकार
क्षेत्रातही काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. गोरेंचा
खडतर आणि संघर्षमय राजकीय प्रवास जवळून पाहिला होता. २०१९ साली माढा
मतदारसंघातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी आ.
गोरेंनी केलेले प्रयत्न फडणवीसांनी पाहिले होते. आ. गोरेंचे नेतृत्वगुण
ओळखूनच भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रीपद दिले आहे.
देवाभाऊंनी शब्द पाळला .....
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ सालीच आ. जयकुमार गोरेंना मंत्रीपद देण्याचा
शब्द दिला होता, मात्र त्यावेळी नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे भाजपला सरकार
स्थापन करता आले नव्हते. गेल्या वर्षी दहिवडी येथील जाहीर सभेत फडणवीसांनी
माण - खटावचा दुष्काळ संपवण्यासाठी जयकुमार गोरेंना सहकार्य करण्याबरोबरच
त्यांना मंत्रीपद देण्याचा जाहीर शब्द दिला होता. काल झालेल्या मंत्रीमंडळ
विस्तारात आ. गोरेंना कॅबिनेट मंत्रीपद देवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी माण
- खटावच्या जनतेला दिलेला शब्द पाळला आहे.
आज
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुती
मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची
बाब आहे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात तसेच आमचे नेते
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन
झालेले महायुती सरकार विकासाचा संकल्प पूर्ण करून नवीन आयाम प्रस्थापित
करेल यात तीळमात्र शंका नाही.आज मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील
तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम
करण्याचा संकल्प करतो.महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी
दिल्याबद्दल पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी,केंद्रीय गृहमंत्री मा. अमित
शाहजी,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे पी नड्डाजी,मुख्यमंत्री
मा.देवेंद्रजी फडणवीस ,भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार !
- आ.जयकुमार गोरे
जयकुमार कमल भगवानराव गोरे ( भाऊ ) राजकीय प्रवास
1) 2007 जिल्हा परिषद सदस्य आंधळी( माण ) गट, नियोजन समिती सदस्य
2) 2009 पहिल्यांदा आमदार विधानसभा सदस्य ( अपक्ष )
३) 2014 दुसऱ्यांदा आमदार विधानसभा सदस्य ( कॉंग्रेस )
4) 2016 सातारा जिल्हा मध्य. सह. बॅंक संचालक
5) 2019 तिसऱ्यांदा आमदार विधानसभा सदस्य ( भाजप )
6) 2022 सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्षपद
7) 2024 सलग चौथ्यांदा आमदार ( भाजप )
8 ) 2024 मंत्री महाराष्ट्र राज्य
9 )माण - खटाव या दुष्काळी भागातील पाणीयोजनांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी गेली १५ वर्षे अहोरात्र संघर्ष
10) मतदारसंघात आंधळी उपसा सिंचन योजना नव्याने मंजूर करुन आणून पूर्णत्वाला नेली.
११) जिहेकठापूर, उरमोडी योजनांची कामे करुन या योजनांचे पाणी मतदारसंघात आणले.
१२) टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी अडिच टीएमसी पाणी नव्याने मंजूर करुन साडीसातशे कोटींची कामे सुरु केली.
१३ ) मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात आणल्या.
१४ ) प्रचंड जनसंपर्क आणि संघटन कौशल्याने मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली.
No comments:
Post a Comment