Ticker

6/recent/ticker-posts

कोरेगाव रेल्वे स्टेशनवर सह्याद्री एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले;

कोरेगाव रेल्वे स्टेशनवर सह्याद्री एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले; एक्सप्रेस थांबवणाऱ्या लोको पायलटवर दोघा चोरट्यांची दगडफेक, मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने खिडकीतून आत हात घालत चोरून नेले. महिला प्रवासी ओरडल्याने अन्य प्रवासी जागे झाले आणि डब्यातील चेन ओढली. एक्सप्रेस थांबल्याचे पाहून चोरट्यांनी लोको पायलटवरच दगडफेक करत पलायन केले. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव रेल्वे स्थानकावर घडला. याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे वास्तव्य करत असलेल्या धर्मादेवी हरिहरनाथ विश्वकर्मा या ५८ वर्षीय महिला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई देवीचे दर्शन करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत निघाल्या होत्या. पुणे स्टेशन येथून त्यांनी रविवारी रात्री पावणेदहा वाजता पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस ने प्रवास सुरू केला. सासवड रोड, जेजुरी, निरा, लोणंद, वाठार स्टेशन आणि सातारा असे थांबे घेत ही एक्सप्रेस सोमवारी मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी
कोरेगाव रेल्वे स्थानकावर आली. अन्य एक्सप्रेसच्या क्रॉसिंगसाठी सह्याद्री एक्सप्रेसला कोरेगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर थांबविण्यात आले. सुमारे दहा मिनिटे ही एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर जागेवरच उभी होती. क्रॉसिंग झाल्यानंतर एक वाजून वीस मिनिटांनी एक्सप्रेस कोल्हापूरच्या दिशेने निघाली असतानाच अचानक उघड्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने श्रीमती विश्वकर्मा यांच्या गळ्यात हात घालून सोन्याचे मनी मंगळसूत्र ओढून चोरून नेले. विश्वकर्मा यांना चोरट्यांची जाणीव होताच त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून मुलगा सतीश हा झोपेतून उठला आणि त्याने लागलीच एक्सप्रेसमधील चेन ओढली. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच लोको पायलेटने जागेवर ब्रेक लावत एक्सप्रेस जागेवर थांबवली. एक्सप्रेस थांबल्याचे पाहून प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघा चोरट्यांनी लोको पायलटच्या दिशेने दगडफेक केली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन प्लॅटफॉर्मवरून ते तिघेजण पळून गेले. 
श्रीमती विश्वकर्मा या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता पोहोचल्या. त्यांनी कोल्हापूर रेल्वे पोलीस दुरक्षेत्रात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ओंबासे तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments