Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानीने फुंकले ऊसदर आंदोलनाचे रणशिंग, ग्रीन पॉवर व वर्धन कारखान्यांच्या तीन हजार रुपयांच्या उचली मान्य नाहीत

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
औंध 
संकेत इंगळे
 खटाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये, अन्यथा गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता, मात्र तरीही दर जाहीर न करताच काही कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
        कोल्हापूर–सांगली परिसरातील ऊस दराचा अंदाज घेऊन खटाव व परिसरातील कारखान्यांनी त्याच प्रमाणे दर द्यावा, हीच स्वाभिमानीची नेहमी भूमिका राहिली आहे. त्यानुसार गोपुज येथील ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड आणि वर्धन शुगर कारखान्यांना संघटनेतर्फे निवेदन देऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन हजार रुपयांची पहिली उचल आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही असा खणखणीत इशारा दिला. सांगली-कोल्हापूरच्या धरतीवरच ऊस दर ठरवावा, अन्यथा ऊस तोड बंद, रस्ता रोको आणि मोर्चा आंदोलन छेडण्याची तयारी आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
         स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  “ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा प्रत्येक कारखान्याचे दरवाजे आम्ही बंद करू,” असा तीव्र इशारा दिला. तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे म्हणाले की, “साखर आणि उपउत्पादनांमधून कारखान्यांना प्रति टन सुमारे ५००० ते ५५०० रुपयांपर्यंत लाभ मिळत आहे. त्यापैकी उत्पादन व वाहतूक खर्च वजा केल्यास शेतकऱ्यांना किमान ३५०० ते ३७०० रुपये देता येणे शक्य आहे. त्यामुळे कमी दरावर ऊस देणार नाही, हे ठाम सांगतो.” दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढील टप्प्यात शिवनेरी आणि जरंडेश्वर साखर कारखान्यांविरोधातही हल्लाबोल आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही कारखान्यांनीही दर न जाहीर करता गाळप हंगाम सुरू केल्यामुळे स्वाभिमानीकडून त्यांच्यावर मोर्चा आणि “हवा सोड आंदोलन” करण्यात येणार आहे.


*चौकट:*

*अनिल पवार (राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना):*

*संघटनेने स्पष्ट केले आहे की, “शेतकऱ्यांच्या हक्काचा दर मिळेपर्यंत स्वाभिमानी गप्प बसणार नाही; गरज पडल्यास संपूर्ण तालुक्यातील कारखान्यांची चाके थांबवू. ही लढाई ऊसदरापुरती मर्यादित नाही; ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची चळवळ आहे. स्वाभिमानी शेतकऱ्यांचा घाम मोलाचा आहे, त्याचा दरही तसाच मोलाचा असावा.”*

या आंदोलांप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, संपर्कप्रमुख शरद खाडे, पक्षाध्यक्ष वैभव पाटील, संघटक संतोष तुपे, सुखदेव पवार, सागर गोडसे, युवा नेते महेश करचे, विकास गोडसे, राजेंद्र पवार, राजू जाधव यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*फोटो- कारखाना प्रशासनाला निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी*

Post a Comment

0 Comments