Ticker

6/recent/ticker-posts

महाबळेश्वरला नगराध्यक्ष पदासाठी सुनील शिंदे यांचे नाव आघाडीवर

महाबळेश्वर :
 नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी संभाव्य दावेदारांविषयी चर्चा वेग घेत आहे. शहरात सध्या विविध नावांची चर्चा होत असून, यामध्ये सुनील शेठ शिंदे यांचे नाव नागरिकांमध्ये विशेषत्वाने पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर सेवा, संपर्कक्षमता आणि दीर्घ अनुभव या आधारे निर्माण झालेली त्यांची प्रतिमा या चर्चेला चालना देत आहे.

नगरपालिका सेवत असतानाच्या कारकिर्दीत शिंदे यांनी नागरिकांच्या दैनंदिन तक्रारींना प्रतिसाद देणे, प्रशासकीय प्रक्रियेत समन्वय साधणे आणि गरजूंना मदत करण्यावर भर दिला. साधेपणा, शांत स्वभाव आणि विनयशील वर्तनामुळे त्यांना जनमानसात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे विविध समाजघटकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, शहरातील पारंपरिक राजकीय समीकरणे, पक्षीय रणनीती, विविध समाजघटकांची भूमिका तसेच इतर अनुभवी दावेदारांचे दावेही तितकेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. आगामी निवडणुकीत विविध पक्ष व स्थानिक नेतृत्व यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, अंतिम स्थिती आगामी घडामोडींनुसार ठरणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण लागू झाल्यानंतर महाबळेश्वरमध्ये नागरिकांच्या अपेक्षांविषयी व्यापक चर्चा सुरू झाली आहे. शहराच्या विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.

आपल्या भूमिकेबाबत शिंदे म्हणाले,
“नागरिकांचा विश्वास हा माझ्यासाठी महत्त्वाचा आधार आहे. भविष्यात जबाबदारी मिळाल्यास महाबळेश्वरला आदर्श नगरपालिकेच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”

महाबळेश्वर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत संभाव्य दावेदारांमधील स्पर्धा अधिकच रंगत जाण्याची चिन्हे असून, नागरिक कोणत्या नेतृत्वावर विश्वास दाखवतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments