सातारा – प्रभाग १९-ब मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. जयश्री तिरोडकर यांच्या प्रचाराला चांगला वेग आला आहे. मागील तीन दशकांपासून शाहूनगर परिसरात तिरोडकर कुटुंबीय सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
भाजपकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा असतानाही तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मात्र, या निर्णयाचे मतदार स्वागत करत असून “काम करणाऱ्या उमेदवाराला संधी हवी” अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याचे दिसत आहे.
तिरोडकर कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील रस्ते, गटार, पाणीपुरवठा, करप्रश्न, हद्दवाढ व वाढीव घरपट्टीविरोधातील लढे यांसह असंख्य स्थानिक कामांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. या कामामुळे परिसरात त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली आहे.
शाहूनगरसहित संपूर्ण प्रभागात दिवसभर घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे मोहीम स्वरूपाचे काम सुरु आहे. जयश्री तिरोडकर यांच्यासोबत पती सामाजिक कार्यकर्ते सचिन तिरोडकर, सासूबाई मीनलताई तिरोडकर आणि संपूर्ण कुटुंबीय सक्रियपणे प्रचारात उतरले आहेत.
मतदारांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देताना त्या नागरिकांना पारदर्शक व जबाबदार नेतृत्व देण्याचा शब्द देत आहेत. “शहूनगरच्या विकासासाठी सुशिक्षित आणि प्रशासनाशी काम करू शकणारे नेतृत्व हवे” अशी भावना मतदारांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन दिवसांत घेतलेल्या प्रचार दौऱ्यात अनेक कुटुंबांनी त्यांना उघड पाठिंबा दर्शवला असून मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात साथ लाभेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
प्रभाग १९-ब मध्ये तिरोडकर यांची लढत अधिकाधिक रंगतदार होत असून या रिंगणात त्या प्रस्थापितांना कठीण टक्कर देणार, अशी चर्चा जोरात आहे.
0 Comments