Ticker

6/recent/ticker-posts

साखर कारखानदारच ठरले खरे मुजोर, प्रशासनाच्या बैठकीकडे फिरवली पाठ, कोरेगावातील वाहतूक कोंडीत नागरिक हैराण


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

कोरेगाव: कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. ऊस हंगाम सुरू झाल्याने साखर कारखान्यांच्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि ट्रकच्या रांगा शहरातील मुख्य रस्त्यांवरून अक्षरशः रेल्वेच्या ताफ्याप्रमाणे धावत आहेत. परिणामी, नागरिक, विद्यार्थी, आपत्कालीन सेवा आणि व्यापारी सर्वच त्रस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत साखर कारखानदारांनी दाखवलेला मुजोरपणा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.

शहरातील कोंडी कमी करण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत सर्वच साखर कारखान्यांना बोलावण्यात आले होते, पण प्रत्यक्षात केवळ एका कारखान्याचा प्रतिनिधीच उपस्थित होता. उर्वरित कारखानदारांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे सपशेल पाठ फिरवली.

 काहींनी प्रतिनिधी पाठवण्याचे औपचारिक काम उरकले, तर अनेकांनी तर प्रतिसाद देणंच टाळलं. या वृत्तीमुळे स्पष्ट झाले की, शहरातील नागरिकांचे हाल, शाळकरी मुलांचे त्रास, आणि वाहतुकीतील जीवघेणी परिस्थिती याबद्दल या कारखानदारांना काडीमात्रही गांभीर्य नाही.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र अनेक प्रशासकीय विभाग प्रमुखांनीही अनुपस्थिती दाखवत या बैठकीची थट्टा उडवली.

बैठकीचा केवळ फार्सच 

पत्रकारांना बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले, आणि बैठकीनंतर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

यामुळे ही बैठक औपचारिकता म्हणूनच घेण्यात आली, की खरोखर काही ठोस निर्णय होणार आहेत, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

गेल्या आठवड्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे स्वतः कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीत अडकले होते. त्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असली, तरी कारखानदारांचा उद्धटपणा आणि निष्क्रिय प्रशासन यामुळे परिस्थितीत बदल झाला नाही.

शहरातील जुने बसस्थानक, आझाद चौक, आणि सातारा–लातूर महामार्ग परिसरात रोजची कोंडी शिगेला पोहोचली आहे. ऊस वाहतुकीमुळे दिवसभर रस्त्यांवर गोंधळ माजतोय, अपघातांची शक्यता वाढली आहे, तर शाळकरी मुलांना वेळेवर पोहोचणेही अवघड झाले आहे.

प्रशासन आणि कारखानदार दोघांनीही आता या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या रोषाचा ज्वालामुखी फुटणार यात शंका नाही. कारखानदारांचा मुजोरपणा आणि प्रशासनाचे मौन हे म्हणजे दोघांच्या संगनमताने कोरेगावकरांचे आयुष्य अक्षरशः रस्त्यावर आले आहे.

Post a Comment

0 Comments