Hot Posts

6/recent/ticker-posts

कुडाळ परिसरात सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्न, दरोडेखोरांच्या हल्यात महिला जखमी


 

मेढा :जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात फुलेनगर,पानस येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये दरोडेखोरांना विरोध दर्शवत असताना धनश्री तानाजी कदम या महिलेच्या हातावर दरोडेखोरांनी चाकूने वार केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास कुडाळ जवळील पुनर्वसित पानस गावात चोरट्यांनी बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र काहीच हाती न लागल्याने त्यांनी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या शेतातील घराचा कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तेथेही त्यांना अपयश आल्याने चोरट्यांनी जवळच असलेल्या तानाजी विठ्ठल कदम यांच्या घराकडे मोर्चा वळवला.त्यावेळी घरात तानाजी कदम,त्यांची पत्नी धनश्री आणि मुलगी उपस्थित होते.सुरुवातीला दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावून उघडण्याचा प्रयत्न केला.आतून "कोण आहे?" अशी विचारणा
होताच त्यांनी दरवाजाला लाथा मारुन तोडण्याचा प्रयत्न सुरु केला.दरवाजा कोसळण्याच्या बेतात असतानाच तानाजी कदम यांच्या पत्नीने तो रोखण्याचा प्रयत्न केला.दरम्यान तानाजी कदम यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्यासाठी हातात फावडे घेतले. हे पाहून दरोडेखोरांनी थेट त्यांच्या पत्नीवर हल्ला चढवत हातावर चाकूने वार केला. याचवेळी तानाजी कदम यांच्या मुलीने शेजाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. धनश्री कदम यांच्या हातावर सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने घटनास्थळी भेट दिली.मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
एकीकडे सशस्त्र दरोड्यामुळे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे जखमी महिलेवर तातडीने उपचार मिळण्यात आलेले अपयश आणि गुन्ह्याचे नोंद करण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यापर्यंत आपत्तीग्रस्ताला धावपळ करण्याची सक्ती हे सर्वसामान्य नागरिकांचे दुर्दैव ठरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कुडाळ पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद रिक्त असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.त्यामुळे सक्षम अधिकाऱ्याअभावी कुडाळ पोलीस दुरक्षेत्रात गुन्ह्यांची नोंद केली जात नाही.त्यामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे.गेल्या काही वर्षांपासून कुडाळ परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना घडत असून अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही.पूर्वी बंद घरे लक्ष्य करणारे चोरटे आता थेट कुटुंबांवर सशस्त्र हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.जावली तालुक्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबाबत तातडीने सखोल चौकशी व ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिक करू लागले आहेत.
तालुक्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी आणि चौका-चौकामध्ये सीसीटीव्ही बसवावेत तसेच ग्रामपंचायतच्या वतीने गुरख्याच्या मदतीला साथीदार देऊन गस्त वाढवावी आणि पोलिसांचे पेट्रोलिंग पथकाच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी कुडाळ गावचे राहिवाशी व अखिल भारतीय मराठा महासघांचे जावळी तालुका उपाध्यक्ष संतोष महामुलकर यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments