संदीप कुलकर्णी/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगावरही वेळेचे बंधन आले असून, येत्या आठवड्यातच कोणत्याही क्षणी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांची हालचाल वेगाने वाढू लागली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धग वाढत चालली असून नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यानंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातील सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यात यंदा जिल्हा परिषदेचे एकूण ६५ गट आणि ११ पंचायत समित्यांमधील १३० गणांसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे अनेक गटांवर सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
येथे आहे लाल दिव्यांची शक्यता
यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला असे असून बुध, औंध, वाठार स्टेशन, कुडाळ, मल्हारपेठ, मारुल हवेली, विंग आणि काले या गटांमध्ये हे आरक्षण लागू आहे. या गटातून निवडून येणाऱ्या महिला सदस्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याने या भागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी, पक्षांतर्गत बैठका आणि रणनीती आखण्याचे सत्र सुरू झाले आहे.
येथे होणार हायव्होल्टेज लढती
दरम्यान, सर्वसाधारण आरक्षण असलेल्या गटांमध्येही मोठ्या प्रमाणावर हायव्होल्टेज लढती होण्याची चिन्हे आहेत.
लिंब, कारी, येळगाव, मसूर, उंब्रज, पाल, कुमठे, तळदेव, म्हावशी, कातरखटाव, खटाव, कुकुडवाड, पिंपोडे बुद्रुक, यशवंतनगर, भादे आणि कोळकी या गटांमध्ये प्रमुख पक्षांसह स्थानिक पातळीवरील ताकदवान नेते निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा सलग निवडणुकांमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पुढील आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल वाजल्यास ग्रामीण भागातील राजकारणाला नवी दिशा मिळणार असून सातारा जिल्ह्यातील सत्तासमीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देसाई, भोसले, पाटील, गोरेंची प्रतिष्ठा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, महायुतीतील चार मंत्र्यांची प्रतिष्ठा थेट पणाला लागणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या चौघांनाही ही निवडणूक ‘साखळी कसोटी’ ठरणार आहे. पालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींद्वारे लढण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महायुतीचा औपचारिक एकोपा असला तरी प्रत्यक्ष मैदानात अंतर्गत स्पर्धा आणि प्रतिष्ठेच्या लढती रंगणार हे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत. विशेषतः पाटण तालुक्यात देसाईंचे पारंपरिक विरोधक सत्यजित पाटणकर भाजपमध्ये दाखल झाल्याने येथील लढती थेट समोरासमोर होणार आहेत. त्यामुळे पाटणमध्ये महायुतीचा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमी असून, अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
वाई तालुक्यात पालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून, तेथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साताऱ्यात मात्र नेहमीप्रमाणे दोन्ही राजांचे मनोमिलन होईल, अशी चर्चा असली तरी या समीकरणात खासदार उदयनराजे भोसले यांचा वरचष्मा कायम राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी ही निवडणूक विशेष महत्त्वाची ठरणार आहे. ज्या खात्याचे ते मंत्री आहेत, त्याच जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने माण आणि खटाव तालुक्यातील सर्व जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सोलापूरचे पालकमंत्रीपद सांभाळत असतानाच साताऱ्यात ही कसरत करावी लागणार असल्याने गोरे यांना औंध, मायणी आणि कुकुडवाड या गटांमध्ये मोठी ताकद लावावी लागणार आहे. यासाठी बंधू अंकुश गोरे आणि शेखर गोरे यांनाही सोबत घेऊन काटेकोर रणनीती आखण्याची गरज भासणार आहे.
कोरेगाव तालुक्यात भाजप आणि शिवसेना एकत्र विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत अपेक्षित असून, कराड दक्षिणेत भाजप विरुद्ध काँग्रेस तर कराड उत्तरेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट, त्यात शिवसेना किंवा महाविकास आघाडीचा हस्तक्षेप अशी त्रिकोणी लढत रंगण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यात मात्र राष्ट्रवादी विरुद्ध उर्वरित सर्व अशी स्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नसून, सातारा जिल्ह्यातील महायुतीतील मंत्र्यांच्या राजकीय वजनाची, संघटन क्षमतेची आणि अंतर्गत ताकदीची खरी परीक्षा ठरणार आहेत.

0 Comments