फलटण शहरातील आलगुडेवाडी परिसरात भरदिवसा एका दुचाकीस्वारास अडवून मारहाण करून रोख रक्कम लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र बाजीराव मदने (वय ३८, रा. धुळदेव) हे शनिवार दिनांक ६ रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता दुचाकीवरून प्रवास करत होते. आलगुडेवाडी परिसरात आल्यानंतर पाठीमागून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत मदने यांना मारहाण केली.
मारहाणीदरम्यान आरोपींनी मदने यांच्या खिशातील ९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. भरवस्तीत अन दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत रवींद्र मदने यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी सुरु करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक शिंदे करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील हालचालींची माहिती संकलित केली जात आहे. लुटलेली रक्कम अन आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली.
अलीकडच्या काळात फलटण शहर अन परिसरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
0 Comments