Ticker

6/recent/ticker-posts

विलिनीकरणावरील शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंचा आक्षेप


दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एका लेखातून केला आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान शशिकांत शिंदे यांच्या लेखातील काही वाक्यांवर सुनील तटकरे यांनी आक्षेप घेत भूमिका स्पष्ट केली आहे.

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हे १२ फेब्रुवारीला होणार होते अशी चर्चा होती. याबद्दल शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती. मात्र १२ तारीख उलटून गेल्यानंतर विलीनीकरणाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. यादरम्यान शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये लेख लिहित खळबळजनक दावा केला आहे.

दादा चूक दुरूस्त करणार होते, यावार तटकरेंचा आक्षेप

दरम्यान शशिकांत शिंदेच्या लेखामध्ये अजित पवार हे पक्षातून बाहेर पडण्याची चूक दुरूस्त करणार होते असा दावा केला आहे, ज्यावर सुनील तटकरे यानी आक्षेप घेतला आहे. याबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की, “शशिकांत शिंदेंचा लेख मी पाहिला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने म्हटलेलं आहे की… जे वाक्य अत्यंत गैर आहे… पुढील जे वाक्य आहे, ‘अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटे नाटे षडयंत्र करून केलेल्या आरोपांमळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. पण झालेली चूक पुन्हा दुरूस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते,’ याला माझा आक्षेप आहे. असं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेंनी दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरुपात करू नये,” असे सुनिल तटकरे म्हणाले.

“भारतीय जनता पक्षाबरोबर आपण असलं पाहिजे ही दादांची भूमिकी अनेक वर्षांपासूनची होती. २०१४ सालीदेखील तीच भूमिका होती. २०१६-१७ मध्ये देखील होती, ज्याचा उल्लेख मी वारंवार स्पष्टपणे उल्लेख केला, त्यावेळी देखील चर्चा अंतिम टप्प्यात गेली होती. कारण त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो. २०१९ ला तर दादांनी स्वच्छपणे सांगितलं होतं की, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं, केंद्रातून आपल्याला पूर्णपणे मदत होऊ शकेल, ती इच्छा दादांनी कधीही लपवून ठेवलेली नव्हती,” असे सुनील तटकरे म्हणाले.

“शशिकांत शिंदेंनी हे जे काही लिहिलं आहे, ते अनाठायी आहे, गैर आहे. असे लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी निधनानंतर वेगळं काहीतरी ते साधू पाहतायत की, त्यांना नेमकं काय बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती. ते आमचे एक जुने जबाबदार सहकारी आहेत, याची मला जाणीव आहे, पण असं लिहण्याच्या मागचा त्यांचा हेतू काय? तो काही मला कळू शकला नाही,” असे सुनील तटकरे म्हणाले.

Post a Comment

0 Comments