सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सोलापूर: सातारा जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेसाठी पाच ते सहा जागा कमी पडत आहेत. तरी अंतिम क्षणी साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.
सातारा जिल्ह्यात भाजपने इतिहासात प्रथमच मोठ्या संख्येने जागा जिंकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही थोडे कमी पडलो हे मान्य आहे; मात्र मतदारांनी दिलेला कौल भाजपच्या बाजूने असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलो असलो तरी निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा एकत्र येण्यास अडचण नसल्याचे गोरे यांनी नमूद केले.
साताऱ्यातील सत्ता स्थापनेसंबंधी घडामोडींवर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीतील मित्र पक्षांमध्ये काही मतभेद असतील तर ते चर्चेतून सोडवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या अंतिम टप्प्यात राजकीय समीकरणे बदलू शकतात. आवश्यक त्या जागांसाठी पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती गोरे यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अंतिम क्षणी साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष झालेला दिसेल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला आहे.

0 Comments