सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
प्रतापगड : महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाटात आज सकाळी रान गव्याच्या धडकेत झालेल्या अपघातात कुंभरोशी गावचे तलाठी शरद साळुंखे जखमी झाले. या घटनेमुळे घाट परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत चिंता व्यक्त होत आहे.
तलाठी शरद साळुंखे हे महाबळेश्वर येथून ‘महाराजस्व अभियान’ बैठकीसाठी कुंभरोशीकडे दुचाकीवरून जात होते. सकाळच्या सुमारास ते आंबेनळी घाटमार्गे प्रवास करत असताना सह्याद्री हॉटेलजवळील वळणावर अचानक रान गवा समोर आला. या रान गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने साळुंखे रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या विविध भागांना दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी साळुंखे यांना मदत केली. त्यानंतर त्यांना कुंभरोशी येथील डॉ. महेंद्र भिलारे यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

0 Comments