तालुक्यातील बनपुरी येथे संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता तसेच पोलीस बंदोबस्तासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने वडूज पोलीस ठाण्याने कार्यक्रमास परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बनपुरी येथील मधुकर मोतीराम देतकर-पाटील यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वडूज पोलीस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. हा कार्यक्रम संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येणार होता.
दरम्यान, महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा सुनील शेलार यांनी या कार्यक्रमाबाबत आक्षेप नोंदवत सोशल मीडियावर तक्रार केली होती. धार्मिक यात्रेदरम्यान अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभर गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून काही ठिकाणी गोंधळाच्या घटना घडल्याचेही निदर्शनास आले आहे. यापूर्वी वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेवाडी येथे आयोजित कार्यक्रमातही मोठी गर्दी होऊन गोंधळ झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच दि. ६ मार्च रोजी वडूज पोलीस ठाणे हद्दीत पारंपरिक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध गावांत मिरवणुका काढण्यात येणार असल्याने पोलीस बंदोबस्तासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बनपुरी येथील गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पत्राद्वारे आयोजकांना कळविले आहे.

0 Comments