सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण : शहरात ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, विना क्रमांक फलकाची वाहने चालविणे तसेच मोठा आवाज करणारे बदल केलेले सायलन्सर लावून फिरणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्याने विशेष मोहीम राबवली. अवघ्या दहा दिवसांत २०७ कारवाया करत १ लाख ४९ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च ते १० मार्च या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. ट्रिपल सीट दुचाकीस्वार, क्रमांक फलक नसलेली वाहने तसेच सायलन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत एकूण २०७ केसेस दाखल करण्यात आल्या असून १ लाख ४९ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी १५ हजार २०० रुपये दंड रोख स्वरूपात वसूल करण्यात आला. कारवाईदरम्यान १४ बदल केलेले सायलन्सर जप्त करण्यात आले आहेत.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, वाहतूक शाखेचे सहायक उपनिरीक्षक सुरेश शिंदे तसेच पोलीस कर्मचारी ऋषिकेश खरात, पांडुरंग धायगुडे, सुरज परिहार आणि संभाजी जगताप यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
शहरातील शांतता भंग करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरु राहील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे.

0 Comments