Ticker

6/recent/ticker-posts

वणव्यात होरपळला अजिंक्यतारा

 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराचा अभिमान मानला जाणारा ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला गेल्या दोन दिवसांपासून वणव्यात होरपळत असून डोंगररांगा अक्षरशः जळताना दिसत आहेत. धुराचे मोठे लोट शहरातूनही स्पष्ट दिसत असून हा वणवा अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून वणवा लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

अजिंक्यताऱ्यापुरता हा प्रश्न मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर, जावळी, खटाव, माण आणि फलटण तालुक्यांतील डोंगरउतारांवरही वणवे पेटत असल्याचे चित्र दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील डोंगरदऱ्या आगीत होरपळत असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यासह पाडळी भागातील गायकवाडवाडी, घोलपवाडी, साठेवाडी, गोसावेवाडी  डोंगररांगांमध्येही वणवे लागल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी गवत आणि झुडपे जळून मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते काही वणवे जाणीवपूर्वक लावले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंगरावर येणारे मद्यपी, सिगारेट ओढणारे लोक तसेच नवीन गवत लवकर यावे म्हणून आग लावणारे काहीजण यामागे कारणीभूत असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. अजिंक्यतारा परिसरात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक युवक आणि स्वयंसेवी कार्यकर्ते वृक्षसंवर्धनाचे काम करत आहेत. अनिल मोरे, राजेंद्र संकपाळ, डॉ. शरद जगताप यांच्यासह अनेकांनी मोठ्या कष्टाने वृक्षलागवड करून झाडांचे संगोपन केले आहे. मात्र दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांमुळे ही झाडे जळून जाण्याची वेळ येत असल्याने कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोंगरातील कडे-कपारींमध्ये आग लागल्यास ती विझवणे अत्यंत कठीण असल्याचेही नागरिकांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या गाड्यांचा पाण्याचा मारा मर्यादित अंतरापर्यंतच पोहोचत असल्याने उंच डोंगरांवरील वणवे विझवणे अवघड ठरते. वनविभागाकडेही आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ अपुरे असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर किल्ल्याच्या पायथ्याशी मंगळाई मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. किल्ल्यावर येणाऱ्या मद्यपी तसेच संशयित हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस चौकी आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

तसेच वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक युवकांची टास्क फोर्स तयार करून वणव्यांवर तातडीने नियंत्रण मिळवण्याची मागणी करण्यात आली आहे. ड्रोनद्वारे नजर ठेवणे, सीसीटीव्ही बसवणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

अजिंक्यतारा हा साताऱ्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मात्र दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांमुळे किल्ला परिसरातील वनसंपदा, पक्ष्यांचे अधिवास आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

Post a Comment

0 Comments