Ticker

6/recent/ticker-posts

बनपुरी येथे तुकाराम बीज यात्रेत गौतमी पाटील कार्यक्रमावर आक्षेप; कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

 


सातारा : खटाव तालुक्यातील बनपुरी येथे संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवत तो रद्द करावा किंवा संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने वडूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला आहे.

संस्थापिका सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दूरध्वनी अन संदेशाद्वारे याची माहिती दिली आहे. संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त धार्मिक वातावरण असताना अशा प्रकारचा कार्यक्रम होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संत तुकाराम महाराजांनी समाजाला चांगले संदेश दिले असून त्यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या यात्रेत सुसंस्कृत वातावरण राहणे आवश्यक आहे. अशा धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अश्लील प्रकारचे नृत्य सादर होण्याची शक्यता असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर कार्यक्रम रद्द करावा किंवा कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक अन संबंधित कलाकार यांना सूचना देऊन अशा प्रकारचे नृत्य सादर होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यास यात्रेला गालबोट लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या वारकरी संप्रदायातील भाविक, महिला तसेच युवा पिढीच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments