फलटण (प्रतिनिधी)
फलटण तालुक्यातील वाजेगाव येथे शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. मुलीला रंग लावण्यावरून निर्माण झालेला वाद अन त्यानंतर झालेल्या अपमानास्पद बोलण्यामुळे दोन्ही गटांत मारामारी झाली. या घटनेत लोखंडी गज, कुऱ्हाड, कोयता अन चाकूचा वापर करण्यात आल्याने अनेकजण जखमी झाले. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ३ मार्च) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पहिली घटना घडली. एका ३४ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, तो घरात झोपलेला असताना शेजारी राहणारे काहीजण त्याच्या मुलीला रंग लावत असल्याचे त्याच्या मुलाने सांगितले. यानंतर तक्रारदार बाहेर येऊन ‘माझ्या मुलीला रंग लावू नका’ असे सांगितले. या कारणावरून वाद निर्माण झाला. संबंधितांनी शिवीगाळ करत लोखंडी गज, काठी, कुऱ्हाड अन कोयत्याने हल्ला केला. या मारहाणीत तक्रारदारासह त्याच्या पत्नी, आई-वडील अन मुलगा असे पाचजण जखमी झाले.
यानंतर दुसऱ्या गटातील एका २९ वर्षीय तरुणानेही पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास तो घरी आला असता काहीजण त्याच्या घरासमोर येऊन ‘तुला मूलबाळ नाही, तुझा या घराशी काय संबंध’ असे म्हणत अपमानास्पद बोलून शिवीगाळ करू लागले. तसेच त्याच्या पत्नीबद्दलही अपशब्द वापरले. यावर त्याने विरोध केल्यावर संबंधितांनी त्याच्यावर चाकू अन लोखंडी गजाने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या मांडीत अन उजव्या हातावर जखम झाली.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या या तरुणाच्या नातेवाईक महिलेलाही हाताने, लाथाबुक्क्यांनी अन चाकूने मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांवर फलटण अन बारामती येथील रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.
शांत समजल्या जाणाऱ्या वाजेगावमध्ये शेजाऱ्यांमध्येच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.

0 Comments