सातारा : शहरात वाहन तोडफोडीच्या तक्रारींनी पोलिसांना व पत्रकारांना भेडसावणाऱ्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. वारंवार तक्रार देणारे क्षेत्र माहुली येथील सेवानिवृत्त शिक्षक अण्णा पवार हेच स्वतःच्या चारचाकी वाहनाच्या तोडफोडीचे सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात पवार यांच्यासह त्यांच्या भाच्याचा सहभाग समोर आला असून त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील शेजाऱ्यांना मानसिक त्रास व्हावा आणि त्यांच्यावर संशय जावा या हेतूने पवार यांनी स्वतःच्या वाहनाची काच सहा वेळा फोडून घेतली. या सर्व घटनांबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. प्रत्येक वेळी अज्ञात व्यक्तींनी वाहनाची तोडफोड केल्याचा दावा करत त्यांनी पोलिसांवर कारवाईसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवार यांनी स्वतःच्या भाच्याकडून चारचाकी वाहनाच्या काचा फोडून घेतल्या. तसेच वाहनाच्या टायरला पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रकारही त्यांनीच घडवून आणला होता. या घटनांनंतर शेजाऱ्यांवर आरोप करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. प्रत्येक घटनेनंतर पवार यांनी सीसीटीव्ही चित्रफिती असल्याचे सांगत पोलिसांवर वारंवार दबाव निर्माण केला होता.
या प्रकरणामुळे काही काळ पोलिसांवर कारवाई होत नसल्याची टीकाही होत होती. मात्र सातारा जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने सर्व नोंदवलेल्या गुन्ह्यांचा बारकाईने तपास केला. घटनास्थळावरील माहिती, सीसीटीव्ही चित्रफिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे हा प्रकार उघडकीस आला.
सदर प्रकरणाचा सखोल तपास करून गुन्ह्याचे धागेदोरे उलगडण्यात पोलिसांना यश आले. तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पवार यांना सहआरोपी करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस विविध गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कार्यरत आहेत. या प्रकरणातील तपास जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाकडून पुढे सुरु आहे.

0 Comments