Ticker

6/recent/ticker-posts

राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्हा



सातारा दि. 6 : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विकसीत महाराष्ट्राचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित असून प्रत्येक स्तंभांत चार उपक्षेत्रांचा समावेश करून एकूण १६ उपक्षेत्रांवर विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील शेतकरी, पर्यटन,    वारसास्थळांचे जतन, आरोग्य या क्षेत्रांमध्ये  महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी  विशेष तरतुद करण्यात आली आहे. 

 सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा वासोटा किल्ला: मुनावळे ते वासोटे किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेण्यात  येणार आहे. तसेच  सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन, जिर्णोद्धार यासाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे. 

महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती 11 एप्रिल 2026 रोजी आहे. या निमित्ताने एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी उपलबध करुन देण्यात येणार आहे.  महात्मा फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील  मौजे कटगुण येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ता. खंडाळा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतुद करण्यात आली आहे. 

 दरे ता. महाबळेश्वर येथे निसर्गोपचार केंद्र, ताणतणाव, जीवनशैलीजन्म आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी निसर्गोपचार केंद्र उभारले जाणार आहे.  कराड  विमानतळांच्या विस्ताराच्या कामांसाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना करण्यात आली आहे. यामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या  पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

Post a Comment

0 Comments