वाई नगरपरिषदेचे सन २०२५-२६ चे आर्थिक वर्ष संपत आले असून नगरपरिषदेच्या प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली साठी विशेष मोहीम सुरु केली आहे.
वाई नगरपरिषदेमार्फत थकीत कराच्या वसुली करिता कडक पावले उचलली असून दि.०६/०३/२०२६ रोजी वाई शहरातील विविध ठिकाणी ६ नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तसेच मालमत्ता कर व पाणीपट्टी हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. नगरपरिषदेस आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच वित्त आयोगाचा निधी, शासनाकडून मिळणारी अनुदाने मिळविणेसाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची वसुली करणे बंधनकारक आहे. नगरपरिषदेच्या उत्पन्नावरच शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती तसेच इतर मूलभूत सुविधांचे नियोजन अवलंबून असते. वाई नगरपरिषदेची पाणीपट्टी व घरपट्टी वसुली कमी असल्याने नगरपरिषदेमार्फत वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून शहरात वसुली पथक व जप्ती पथक द्वारे कारवाई सुरू आहे.
जे मालमत्तेधारक मुदतीत कर भरणा करणार नाहीत अशा मालमत्तांवर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार मालमत्ता सील करणे, मालमत्ता जप्त करणे, पाणीपुरवठा खंडित करणे, मलमत्तां समोर हलगी वाजविणे, थकबाकीदारांच्या नावांची यादी चौका चौकांत फ्लेक्सद्वारे लावणे आदी मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. मालमत्ता कर, गाळाभाडे तसेच पाणीपट्टी हे नगरपरिषदेच्या महसुली उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असून या माध्यमातून आलेल्या निधीतूनच विविध विकास कामे मार्गी लावली जातात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच कर भरून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे.तसेच सर्व मिळकत धारकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाड्याची रक्कम तात्काळ नगरपरिषद कार्यालयात भरणा करून कटू कारवाई टाळावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी केले आहे.
0 Comments