पाटण, दि. ___ : पाटण शहरातील धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसह बाजारपेठेतील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे कराड-चिपळूण मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या कामासाठी धांडे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून हा बदल शुक्रवार (दि. २७ मार्च) पासून पुढील दोन महिने लागू राहणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अधिसूचनेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई वरील पाटण शहरातील महत्त्वाचा धांडे पूल पुनर्बांधणीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे.
अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरून पाचवड फाटा–उंडाळे–कोकरूड–मलकापूर–आंबा घाट–संगमेश्वर मार्गे वळविण्यात आली आहे.
तर चिपळूणकडून कराड-उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूकही याच मार्गाने उलट दिशेने वळविण्यात येणार आहे.
हलकी वाहतूक ‘नेवारस्ता’ मार्गे
कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी हलकी वाहतूक नवारस्ता–गव्हाणवाडी फाटा–नेरळे–गांड मार्गे पुढे चिपळूणकडे जाईल.
तसेच चिपळूणकडून येणारी हलकी वाहतूक नेरळे–गांड–गव्हाणवाडी फाटा–नवारस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे वळविण्यात आली आहे.
६० दिवसांचा कालावधी; पोलिस बंदोबस्त तैनात
धांडे पुलाचे पुनर्बांधणी काम आणि बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यासाठी सुमारे ६० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
वाहतूक बदलांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. सर्व वाहनचालकांनी नवीन मार्गांची नोंद घेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अधिसूचनेत करण्यात आले आहे.
दरम्यान, या बदलामुळे कराड-चिपळूण मार्गावरील प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरणार आहे.
0 Comments