Ticker

6/recent/ticker-posts

“महाबळेश्वर घाटात संपवण्याचा डाव?”; जि.प. सदस्यांचा गंभीर आरोप, पोलिसांवर अन ‘त्या’ मंत्र्यावर बोट

सातारा: झेडपी निवडीतल्या राड्यानंतर प्रकरण आणखी तापलं आहे. जि.प. सदस्य अनिल देसाई अन संदीप मांडवे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर अन एका मंत्र्यावर थेट गंभीर आरोप केले. “आम्हाला महाबळेश्वरच्या घाटात नेऊन संपवण्याचा डाव होता. आमचा एन्काऊंटर झाला असता,” असा धक्कादायक दावा त्यांनी केला.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. “मतदानाच्या दिवशी पोलिसांनी बळाचा वापर करत आम्हाला जनावरांसारखं ओढत नेलं. आम्ही ओरडत होतो—आम्हाला मतदान करू द्या. गुन्हा दाखल असला तरी मतदानाचा हक्क आहे,” असं ते म्हणाले. “बापूसाहेब शिंदे स्वतः आमच्यासोबत असल्याचं सांगत होते, तरी पोलिसांनी ऐकलं नाही,” असा आरोपही त्यांनी केला.

“आमच्यावर खुनाचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले. आम्हाला घरी फोन करू दिला नाही. आधी आम्हाला महाबळेश्वरच्या घाटात नेलं. आमच्या जीवाला धोका होता,” असा दावा त्यांनी केला. “हा आमच्या आयुष्यातला काळा दिवस आहे. यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात अशी घटना होणं दुर्दैवी,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

देसाई यांनी पोलिसांवर थेट आरोप करत “पोलीस अधिकारी रमेश गर्जे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानेच आम्हाला किडनॅप केलं,” असं सांगितलं. “पोलिसांना ‘बॉस’चा फोन माझ्यासमोर येत होता,” असा आरोपही त्यांनी केला.

संदीप मांडवे यांनीही देसाई यांच्या आरोपांना दुजोरा देत “आमचा जीव वाचला, हेच नशीब,” असं म्हटलं. “आम्हाला मतदानापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं,” असा त्यांचा आरोप आहे.

दरम्यान, या प्रकरणात महाबळेश्वर न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

या गंभीर आरोपांवर संबंधित मंत्री किंवा पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र झेडपी निवडीतल्या राड्यानंतर आता “अपहरण, एन्काऊंटरचा डाव, राजकीय हस्तक्षेप” अशा आरोपांनी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं आहे.

एकूणच, साताऱ्यात सुरू झालेला वाद आता केवळ निवड प्रक्रियेपुरता राहिलेला नसून तो थेट राजकीय आणि कायदेशीर पातळीवर पोहोचला आहे. पुढील चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments