फलटण : सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण तालुक्यातील ढवळ पाटी येथे मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या कारणावरून १८ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सोमनाथ संदीप जाधव (वय १८, रा. दालवडी, ता. फलटण) असे मृत युवकाचे नाव आहे. अल्पवयीन वयातच झालेल्या या अमानुष हत्येमुळे परिसरात भीती अन संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ एप्रिलच्या रात्री सोमनाथ हा जेवण करून घराबाहेर अंगणात झोपला होता. मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर सोमनाथच्या क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना तात्काळ ढवळ पाटी येथे येण्यास सांगितले.
वडील घटनास्थळी पोहोचले असता, एका चारचाकीतून दोन जण आणि सोमनाथ खाली उतरले. यावेळी संबंधितांनी “तुमचा मुलगा आमच्या बहिणीशी मोबाईलवर चॅटिंग करतो, त्यामुळे आम्ही त्याला मारहाण केली आहे,” असे सांगत त्याला जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. त्याचवेळी आणखी दोन जण दुचाकीवरून तेथे आले.

यानंतर चौघांनी मिळून सोमनाथवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. तोंड, छाती अन पोटावर जोरदार प्रहार करण्यात आले. जीव वाचवण्यासाठी सोमनाथ पळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाजवळील पटांगणात त्याला गाठले. तेथे त्याला पुन्हा मारहाण करून रस्त्यावर आपटण्यात आले.
या घटनेदरम्यान एक स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आला असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या सोमनाथला तात्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून युवकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणावरून एवढ्या टोकाची हिंसक प्रतिक्रिया देण्यात आल्याने समाजात वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
मृत सोमनाथचे वडील संदीप उमाजी जाधव (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी मुलीचे नातेवाईक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


0 Comments