मायणी
कुस्तीमध्ये यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना मायणी ता.खटाव येथील नामांकित पैलवान राहुल कोरडे याच्यावर काळाने घाला घातला व ऐन उमेदीच्या वयात विसाव्या वर्षी त्याचे दुःखद निधन झाले.त्यामुळे मायणीसह परिसरातील कुस्ती शौकीनांवर शोककळा पसरली आहे.
मायणी येथील कुस्ती क्षेत्रातील नामांकित पैलवान राहुल कोरडे यास लहानपणापासूनच कुस्तीचा शोक होता.मायणी येथे असलेल्या समर्थ व्यायाम शाळेत कुस्तीचा सराव करत असताना सांगली येथील भोसले व्यायाम मंदिरात तो कुस्तीचे धडे गिरवीत होता. मायणीतच पहिलीपासून पदवी पर्यंतचे शिक्षण घेत असताना त्याने आपला कुस्ती व्यासंग ही वाढविला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी सुवर्ण व पुढील दोन वर्षे तृतीय क्रमांक,शिवाजी विद्यापीठांतर्गत झालेल्या कुस्ती स्पर्धेत चॅम्पियनशिप, अकलूज येथे झालेल्या त्रिमूर्ती केसरी स्पर्धेत प्रथम क्रमांक व माण खटावचा केसरी आदी अनेक पुरस्कार त्याने प्राप्त केले होते.
निमसोड येथे यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीचा आखाडा जिंकून तो तडवळे येथील कुस्तीच्या आखाड्यात खेळण्यासाठी निघाला असता वाटेतच त्याला चक्कर आली व त्याला तातडीने मायणी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुन्हा सह्याद्री हॉस्पिटल ,कराड येथे दाखल केले होते मात्र सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांना त्याच्या शरीराने साथ दिली नाही व त्याची प्राणज्योत मावळली.
आपल्या भावाच्या कुस्ती शौकाच्या पूर्ततेसाठी थोरल्या भावाने मजुरी करून त्याला पैसे उपलब्ध करून दिले.अतिशय गरीबीच्या परिस्थितीत तो महाराष्ट्रात नाव गाजवले या अपेक्षा त्याच्याकडून होत्या मात्र नियतीला ते मान्य नव्हते.
.jpg)
0 Comments