Ticker

6/recent/ticker-posts

नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू ,नातेपुतेनजीकची घटना, मृत दाेघे माण तालुक्यातील मोगराळेचे



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

नातेपुते: नातेपुते परिसरात नीरा उजवा कालव्यात कार कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चालक थोडक्यात बचावला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने माण तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मुंबईहून फोंडशिरसकडे जाणारी कार आज पहाटे सुमारे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावरील पुलावरून जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट निरा उजवा कालव्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की कारमधील प्रवासी पाण्यात अडकले.

पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात प्रीती टिळेकर, मंजुळा जठार अन हनुमंत जठार यांचा मृत्यू झाला. मंजुळा अन हनुमंत जठार हे मोगराळे (ता. माण) येथील रहिवासी असून ते सध्या मुंबई येथे वास्तव्यास होते. प्रीती टिळेकर या त्यांची मुलगी होती.

सुनील टिळेकर हे चालक असून ते या अपघातातून बचावले. अपघातानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत बाहेर आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. कार पाण्यात बुडाल्याने इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला.

रामनवमी निमित्त कुटुंबासह फोंडशिरस येथे आलेले टिळेकर कुटुंब परतीच्या प्रवासात होते. मुलाला नातेवाईकांकडे ठेवून ते परत घेण्यासाठी निघाले असताना हा अपघात घडला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस अन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कालव्यात बुडालेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेन अन यंत्रसामग्रीची मदत घेण्यात आली. मोठ्या प्रयत्नांनंतर कार बाहेर काढण्यात आली. या घटनेमुळे मोगराळे गावासह माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. भरधाव वेग अन नियंत्रण सुटणे ही अपघाताची प्राथमिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments