Ticker

6/recent/ticker-posts

झेडपीत उद्या राजकीय शक्तीपरीक्षा, सभापती निवडीचा हायव्होल्टेज सामना, कोण डाव मारणार याकडे लक्ष


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत झालेल्या राड्यानंतर शनिवारी ४ रोजी  होणाऱ्या सभापती निवडीकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. दोन्ही बाजूंनी रणनीती आखून मैदानात उतरण्याची तयारी सुरू असून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

झेडपी निवडीत झालेल्या गोंधळानंतर हा पुढील टप्पा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. त्या दिवशी झालेल्या धक्काबुक्की, अटक आणि आरोपांच्या मालिकेमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष साताऱ्याकडे वेधले गेले होते. या घटनेचे पडसाद थेट विधानमंडळात उमटले. पोलिसांवर कारवाईची मागणी, निलंबनाचे आदेश, त्यावरून निर्माण झालेले मतभेद आणि चौकशीची घोषणा यामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणतीही ढिलाई न ठेवता कडक बंदोबस्त उभारला आहे. जिल्हा परिषद परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून केवळ अधिकृत सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूंनी निवडीपूर्वी जोरदार हालचाली केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांनी सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर शुक्रवारी कास पठारावरील एका हॉटेलमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सदस्यांसोबत सविस्तर चर्चा करत अंतिम डाव आखल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे, पालकमंत्री शंभूराज देसाई हे कोयना डोंगरी महोत्सवात व्यस्त असले तरी त्यांनीही निवडीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू ठेवल्या आहेत. मंत्री मकरंद पाटील यांच्या साथीने त्यांनी आपल्या गटाची बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शेवटच्या क्षणापर्यंत संपर्क साधत संख्याबळ टिकवण्याची धडपड सुरू आहे.

झेडपी निवडीत घडलेल्या घटनांमुळे या निवडीचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्या वेळी काही सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचे आरोप झाले. पोलिसांवर बळाचा वापर केल्याचे आरोप झाले, तर दुसरीकडे कायद्याप्रमाणे कारवाई केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. या वादाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली.

याच प्रकरणावरून साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी चर्चेत आले. त्यांच्या निलंबनाची मागणी झाली, उपसभापतींकडून निर्देश देण्यात आले, त्यावर सभापतींकडून निर्णय राखून ठेवण्यात आला. नंतर निलंबन मागे घेतल्याची घडामोड घडली. त्यानंतर दोशी अर्जित रजेवर गेल्याने नवीन चर्चा सुरू झाली. या सर्व घटनांनी प्रशासन आणि राजकारण यांच्यातील तणाव स्पष्ट केला.

दरम्यान, जि.प. सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केलेल्या गंभीर आरोपांनीही वातावरण ढवळून निघाले. “आम्हाला मतदानापासून रोखले, जीव धोक्यात होता,” असे आरोप त्यांनी केले. या आरोपांमुळे प्रकरणाला अधिकच धार आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आजची सभापती निवड ही केवळ औपचारिक प्रक्रिया राहिलेली नाही, तर ती राजकीय शक्तीपरीक्षा ठरणार आहे. भाजपने आधीच अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर सत्ता मिळवत आपली पकड मजबूत केली आहे. आता सभापती पदावरही नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी ही निवड प्रतिष्ठेची बनली आहे. मागील पराभवानंतर आपले संख्याबळ पुन्हा एकत्र आणत प्रतिआघात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे मतदानाच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.

आजचा डाव कोण मारणार

साताऱ्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे.  आता केवळ आकडे पुरेसे नाहीत; संघटन, संपर्क आणि शेवटच्या क्षणाचा डाव यावरच निकाल ठरणार आहे. एकूणच, मागील राड्याच्या सावटाखाली आजची सभापती निवड होत आहे. प्रशासन सज्ज, नेते सक्रिय आणि कार्यकर्ते सज्ज अशा परिस्थितीत पुन्हा एकदा साताऱ्यात राजकीय तापमान वाढले आहे. आता या हाय व्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार, आणि डाव कोण जिंकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments